शारजा - आयपीएलमध्ये आज किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरू यांच्यात लढत होत आहे. या लढतीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीने आयपीएलमधील विक्रमाचे अजून एक शिखर सर केले आहे. विराट कोहली हा आता आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. त्याने कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.
आयपीलएमध्ये आज सुरू असलेल्या लढतीमध्ये विराट कोहलीने दोन विक्रम आपल्या नावे केले. पहिला विक्रम म्हणजे विराट कोहलीचा आजचा सामना आरसीबीसाठी २०० वा सामना आहे. तर फलंदाजीस उतरल्यावर विराटने अजून एक विक्रम आपल्या नावे केला. पंजाबविरुद्ध १० वी धाव घेतल्यानंतर विराट कोहली आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला.
आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम हा महेंद्र सिंह धोनीच्या नावे होता. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत ४ हजार २७५ धावा फटकावल्या आहेत. मात्र विराट कोहलीने आज त्याला मागे टाकले आहे.
दरम्यान, विराट कोहलीने आज रॉयल चॅलेंजर्स बंगळूरूसाठी २०० वा सामना खेळला. आयपीएल आणि चॅम्पियन्स लीगमधील लढती मिळून विराटने हे २०० सामने खेळले आहेत. तसेच विशेष बाब म्हणजे विराट कोहली आयपीएलमध्ये सुरुवातीपासून आतापर्यंत केवळ एकाच संघाकडून खेळला आहे.