Join us

IPL 2020 : प्ले-ऑफच्या आशा कायम राखण्यासाठी हैदराबादला मुंबईविरुद्ध विजय आवश्यक

IPL 2020: हैदराबाद संघाचा नेटरनरेट प्ले-ऑफच्या शर्यतीत सहभागी अन्य संघांच्या तुलनेत सरस आहे. अशा स्थितीत मुंबईचा पराभव करीत त्यांना अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याची संधी आहे. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2020 06:59 IST

Open in App

शारजाह : गेल्या दोन सामन्यांत दिल्ली कॅपिटल्स व रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (आरसीबी) संघांना पराभूत करीत सूर गवसलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) स्पर्धेत प्ले-ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मंगळवारी येथे मुंबई इंडियन्सचे कडवे आव्हान मोडून काढावे लागणार आहे. हैदराबाद संघाचा नेटरनरेट प्ले-ऑफच्या शर्यतीत सहभागी अन्य संघांच्या तुलनेत सरस आहे. अशा स्थितीत मुंबईचा पराभव करीत त्यांना अंतिम चारमध्ये स्थान मिळविण्याची संधी आहे. आक्रमक जॉनी बेयरस्टॉला अंतिम ११ खेळाडूंमधून वगळण्याचा खडतर निर्णय घेतल्यानंतर संघाचा समतोल साधल्या गेला आहे. रिद्धिमान साहाने डेव्हिड वॉर्नरच्या साथीने सलामीवीर म्हणून प्रभावित केले आहे तर जेसन होल्डरने संघाला अष्टपैलू खेळाडूचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. आरसीबीविरुद्ध गेल्या लढतीत अखेरच्या षटकात वेगवान गोलंदाज होल्डर व संदीप शर्मा यांनी प्रभावी कामगिरी केली होती. डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजन व अनुभवी राशीद खान यांच्या समावेशामुळे संघाची गोलंदाजीची बाजू भेदक झाली आहे. मुंबईसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध चुका करण्याची मुभा नाही, याची हैदराबाद संघाला चांगली कल्पना आहे. मुंबई संघ आयपीएलच्या पाचव्या जेतेपदाकडे वाटचाल करीत आहे. दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मंबई संघाने यापूर्वीच्या सामन्यांत आरसीबी व दिल्ली कॅपिटल्सचा सहज पराभव करीत प्ले-ऑफसाठी पात्रता मिळवली आहे. 

मजबूत बाजूमुंबई : बोल्ट व बुमराहची भेदक गोलंदाजी. सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, क्विंटन डिकॉक यांचा शानदार फॉर्म.हैदराबाद : कर्णधार डेव्हिड वॉर्नर, रिद्धिमान साहा शानदार फॉर्मात. त्यांना साथ देण्यासाठी केन विलियम्सन, मनीष पांडे सक्षम. 

कमजोर बाजूमुंबई : कर्णधार रोहित शर्मा दुखापतग्रस्त. बुमराह, बोल्ट अपयशी ठरले तर अन्य गोलंदाजांवर दडपण. हैदराबाद : गोलंदाजीमध्ये जेसन होल्डर, संदीप शर्मा अपयशी ठरले तर दडपण येण्याची शक्यता.