Join us  

IPL 2020 : राजस्थान रॉयल्सविरुद्ध धोनीला खुणावत आहेत ‘हे’ दोन विक्रम

क्रिकेटविश्वात अनेक विक्रमांचे थर रचलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे एकाचवेळी फलंदाजीत आणि यष्टिरक्षणात विक्रमी कामगिरी करण्याची संधी चालून आली आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2020 2:54 PM

Open in App

मुंबई : यंदाच्या आयपीएलची दणक्यात विजयी सुरुवात करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जला आपल्या दुसऱ्या सामन्यात आज राजस्थान रॉयल्सच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. एकीकडे चेन्नई आपल्या पूर्ण ताकदीने या सामन्यात खेळणार असून दुसरीकडे राजस्थानला हुकमी अष्टपैलू बेन स्टोक्स याच्या अनुपस्थित खेळावे लागणार आहे. या सामन्यातून दोन विक्रमांना गवसणी घालण्याची नामी संधी चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीकडे असून हे विक्रम गाठण्यात तो यशस्वी ठरतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

क्रिकेटविश्वात अनेक विक्रमांचे थर रचलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे एकाचवेळी फलंदाजीत आणि यष्टिरक्षणात विक्रमी कामगिरी करण्याची संधी चालून आली आहे. गेल्याच महिन्यात अचानकपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सविरुद्ध पहिल्यांदाच मैदानात उतरलेल्या धोनीला फलंदाजीत फारशी छाप पाडता आली नाही. मात्र त्याने कल्पक आणि आक्रमक नेतृत्त्वाच्या जोरावर संघाला विजयी केले. धोनीने धावांचा पाठलाग करताना आपल्याआधी सॅम कुरेनला फलंदाजीला पाठवले आणि कुरेननेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरविताना तुफान फटकेबाजी करत सामना चेन्नईच्या बाजूने झकविला.

मंगळवारी चेन्नईपुढे आव्हान असेल ते राजस्थानच्या संघाचे. या सामन्यात टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकारांचा पल्ला गाठण्याची संधी धोनीकडे असेल. टी-२० क्रिकेटमध्ये भारताकडून आतापर्यंत केवळ रोहित शर्मा आणि सुरेश रैना यांनीच ३०० हूनअधिक षटकार ठोकले आहेत. रोहितने सर्व प्रकारच्या टी-२० सामन्यांत मिळून ३६१ षटकार ठोकले असून यानंतर क्रमांक लागतो तो सुरेश रैनाचा.

रैनाने आतापर्यंत एकूण ३११ षटकार ठोकले आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये रैना खेळणार नसल्याने आता त्याला मागे टाकण्याचीही संधी धोनीकडे आहे. मात्र अद्याप धोनी ३०० षटकारांपासून केवळ ५ षटकांनी दूर आहे. धोनीने राजस्थानविरुद्ध हे लक्ष्य साधले, तर टी-२० क्रिकेटमध्ये ३०० षटकार ठोकणारा तो केवळ तिसरा भारतीय ठरेल. तसेच, आयपीएलमध्ये यष्टीरक्षक म्हणून झेलांचे शतक पूर्ण करण्याचीही संधी धोनीकडे आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून धोनीने ९६ झेल घेतले असून शतक पूर्ण करण्यासाठी त्याला ४ झेलची आवश्यकता आहे. आयपीएलमध्ये यष्टिरक्षक म्हणून सर्वाधिक झेल दिनेश कार्तिकने घेतले असून त्याने आतापर्यंत १०१ झेल घेतले आहेत.

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीचेन्नई सुपर किंग्सIPL 2020