दिल्ली कॅपिटल्स ( Delhi Capitals) संघाला आणखी एक धक्का बसला आहे. अमित मिश्रानंतर जलदगती गोलंदाज इशांत शर्मा ( Ishant Sharma) Indian Premier League ( IPL 2020) ला मुकणार आहे. त्याला बदली खेळाडू निवडण्यासाठी दिल्ली कॅपिटल्सनं आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलकडे परवानगी मागितली आहे. इशांत दुखापतीमुळे बाकावरच आहे आणि IPL 2020त तो केवळ एकच सामना खेळलेला आहे. मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल्स या दोघांनी ७ पैकी ५ सामने जिंकून प्रत्येकी १० गुणांसह Point Tableमध्ये अनुक्रमे पहिले व दुसरे स्थान पक्के केले आहे.
पाठीच्या दुखापतीमुळे इशांतनं मैदानावर उतरलेला नाही. २० सप्टेंबरला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यासाठी नेट्समध्ये सराव करताना त्याला ही दुखापत झाली होती. त्यामुळे पहिल्या दोन सामन्यांत तो मुकला होता आणि तिसऱ्या सामन्यात त्यानं कमबॅक केले होते. पण,त्यानंतर तो एकही सामना खेळलेला नाही. ''इशांतच्या जागी दुसरा खेळाडू निवडण्याची परवानगी आम्ही आयोजकांकडे मागितली आहे,''असे सूत्रांनी ANIला सांगितले आहे.
पृथ्वी शॉ व शिखर धवन यांच्यासारखे स्फोटक सलामीवीर, कर्णधार श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत सारखे युवा फलंदाज मधलीफळी सक्षमपणे सांभाळताना दिसत आहेत. पंतला दुखापतीमुळे पुढील दोन सामने खेळता येणार नसले तरी दिल्लीकडे अजिंक्य रहाणेसारखा अनुभवी फलंदाज आहेच. मार्कस स्टॉयनिस हा सप्राईझिंग पॅकेज ठरत आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाड्यांवर तो संघासाठी योगदान देत आहेत. कागिसो रबाडासारखे शस्त्र ज्यांच्याकडे असेल मग त्यांना कशाला भीती.. आर अश्विनच्या रुपानं अनुभवाची मोठी शिदोरीच दिल्लीच्या हाती लागली आहे. अमित मिश्राची उणीव त्यांना नक्की जाणवेल. शिमरोन हेटमारय हा प्रतिस्पर्धींची धुलाई करणारा फलंदाजही आहेच त्यांच्याकडे.
दिल्लीचे सामने
14 ऑक्टोबर, बुधवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
17 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, शारजाह
20 ऑक्टोबर, मंगळवार - किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
24 ऑक्टोबर, शनिवार - कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, अबु धाबी
27 ऑक्टोबर, मंगळवार - सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, दुबई
31 ऑक्टोबर, शनिवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, दुपारी 3.30 वाजल्यापासून, दुबई
2 नोव्हेंबर, सोमवार - दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, सायंकाळी 7.30 वाजल्यापासून, अबु धाबी