Join us  

IPL 2020 :...त्यामुळे CSK ची कामगिरी ढेपाळली, ब्रायन लारानं सांगितलं नेमकं कारण

CSK News : १३ वर्षांत प्रथमच लीगमधून लवकर बाहेर पडण्याची नामुष्की चेन्नईला ओढवून घ्यावी लागली.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 3:55 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘अनुभवी खेळाडू सामन्याचे चित्र पालटू शकतात, हे खरे आहे. दुसरीकडे टी-२० सारख्या प्रकारात युवा खेळाडूंचा जोश महत्त्वाचा मानला जातो. चेन्नई सुपरकिंग्सने हे तत्त्व यंदा लक्षात घेतल्याचे दिसत नाही. युवा आणि अनुभवी मिश्रण न करता अनुभवी खेळाडूंच्या बळावर सामने जिंकण्याचे डावपेच आखले.’ ही रणनीती अंगलट आल्याचे मत माजी दिग्गज ब्रायन लारा याने व्यक्त केले. ‘युवा खेळाडूंकडे डोळेझाक करीत अनुभवाला प्राधान्य देणे हे सीएसकेच्या मुळावर उठले. संघाची कामिगरी कमालीची ढेपाळली. १३ वर्षांत प्रथमच लीगमधून लवकर बाहेर पडण्याची नामुष्की ओढवून घ्यावी लागली. आता तरी उर्वरित सामन्यात युवा चेहऱ्यांना स्थान द्या,’ असे  कळकळीचे आवाहन लाराने सीएसकेच्या व्यवस्थापनाला स्टार स्पोर्टस्‌च्या ‘सिलेक्ट डगआऊट’ या कार्यक्रमात केले.लारा म्हणाला, ‘ सीएसकेत वयोवृद्ध खेळाडूंचा भरणा असून, युवा चेहरे दिसतच नाहीत. काही विदेशी चेहरेदेखील दीर्घकाळापासून खेळत आहेत. अनेक जण या संघाला ‘म्हाताऱ्यांची फौज’ असे संबोधतात. अनुभवाला प्राधान्य दिल्यानंतरही यंदा वाट लागली. यावेळी मैदानावर येताना नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाईल, अशी आशा करू या.’सामन्यागणिक धोनीचा संघ जिंकावा, अशी अपेक्षा बाळगतो. आमच्या अपेक्षा हवेत विरतात. आता फोकस पुढच्या वर्षी संघबांधणीवर असायला हवा. यंदाच्या अन्य सामन्यात युवा खेळाडूंना आजमावून पाहायला हवे.  हेच खेळाडू पुढच्या सत्रात हिरोसारखी कामगिरी करू शकतील,’ असे मत लाराने व्यक्त केले.

टॅग्स :IPL 2020चेन्नई सुपर किंग्स