नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) १३ वे पर्व ‘बायो सिक्योर’ वातावरणामुळे सर्वांत सुरक्षित असेल, असे मत भारतीय क्रिकेट नियामक (बीसीसीआय) भ्रष्टाचार विरोधी समितीचे प्रमुख (एसीयू) अजित सिंग यांनी व्यक्त केले. क्रिकइन्फोने अजित सिंग यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, ‘कोविड-१९ महामारीदरम्यान खेळल्या जाणाऱ्या या लीगबाबत नक्कीच काही प्रमाणात चिंतेचे वातावरण असू शकते, पण भ्रष्टाचार विरोधी दृष्टिकोनातून बघता ही सर्वांत सुरक्षित वातावरणात खेळली जाणारी स्पर्धा असेल.’
याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘याचे मुख्य कारण बायो सिक्योर वातावरणात खेळताना संघ, सहायक कर्मचारी व बाहेरच्या लोकांदरम्यान कुठलाही संपर्क राहणार नाही. तुलनात्मक विचार करता हा मोसम चांगला राहील, पण पूर्णपणे सेफ असेल, हे सांगणे कठीण आहे.’ यापूर्वीच्या पर्वामध्ये सट्टेबाज खेळाडूंकडे सहजपणे पोहचू शकत होते. ते हॉटेलच्या सभोवताल फिरत होते, हॉटेल लॉबीमध्ये बसत होते.
सोशल मीडियावर नजर
सिंग यांनी सांगितले की, ‘यावेळी भ्रष्टाचार करणारे थेट व्यक्ती संपर्कात न येता सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्क साधण्याची शक्यता आहे.’ दुसरे आव्हान म्हणजे, सट्टेबाजीचा बाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आमची सट्टेबाजावर नजर राहील. सट्टेबाजीच्या बाजारात काय सुरू आहे, त्याचा कल कसा आहे, यावर आमचे लक्ष असेल.