Join us  

IPL 2021: अभ्यास करावा लागणार नाही म्हणून क्रिकेटकडे वळला नितीश राणा! 

IPL 2021, Nitish Rana: नितिश राणाला लहानपणी क्रिकेट फारसे आवडतच नव्हते. केवळ अभ्यास करावा लागणार नाही आणि खेळायला मिळेल म्हणून तो क्रिकेटकडे वळल्याची त्याच्या बालपणीची मनोरंजक कहाणी आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2021 2:15 PM

Open in App

-ललित झांबरे

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR)  फलंदाज नितीश राणा (Nitish Rana)  सध्या चर्चेत आहे. आयपीएलमध्ये रविवारी सनरायझर्स हैदराबादविरुध्द 80 धावांची खेळी करुन तो सामनावीर ठरलाय. त्यासोबतच त्याच्या 0, 81, 0, 87, 0, 80 या गेल्या सहा डावातील चकित करणाऱ्या त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीनं लक्ष वेधून घेतलेय. पण नितिश राणाला लहानपणी क्रिकेट फारसे आवडतच नव्हते. केवळ अभ्यास करावा लागणार नाही आणि खेळायला मिळेल म्हणून तो क्रिकेटकडे वळल्याची त्याच्या बालपणीची मनोरंजक कहाणी आहे जी त्याने स्वतःच एका मुलाखतीत सांगितली आहे. 

आपण क्रिकेट का व कसे खेळायला लागलो याबद्दल नितीशने सांगितले की त्याचे वडील व काका हे क्रिकेटचे चाहते होते. आपण नाही पण आपल्या मुलांपैकी एकाने तरी नावाजलेले क्रिकेटपटू बनावे हे त्यांचं स्वप्न होतं. हे स्वप्न त्यांनी नितीशमध्ये पाहिलं आणि त्याला क्रिकेटचे धडे देण्यात कोणतीही कसर सोडली नाही. पण छोट्या नितीशला क्रिकेट खेळायची फारशी काही इच्छा नव्हती पण केवळ अभ्यास करावा लागणार नाही आणि अभ्यास न करता उलट खेळायला मिळेल म्हणून त्याने हाती बॅट पकडली आणि आता आयपीएलसारख्या नावाजलेल्या स्पर्धेत तो सामनाविराचे पुरस्कार जिंकतोय.

नितीश हा मूळचा दिल्लीचा (Delhi). त्याला क्रिकेटपटू बनवायचे म्हणून त्याचे वडील त्याला गौतम गंभीरचे प्रशिक्षक संजय भारद्वाज (Sanjay Bhardwaj)  यांच्याकडे घेऊन गेले आणि तिथून नितीशचा क्रिकेटपटू म्हणून प्रवास सुरू झाला. बालपणी आपण जरा जाडच होतो त्यामुळे प्रशिक्षकांनी आपल्याला मैदानावर खूप पळवलंय असं सांगताना तो म्हणतो की संजू सरांकडे गौतम गंभीरही (Gautam Gambhir)  खेळायला यायचे. आम्हा युवा क्रिकेटपटूंसाठी ते फार मोठं नाव होतं. त्यामुळे गौतम भैया ज्यादिवशी येणार असत त्यादिवशी आमचा सराव आधीच संपवला जायचा आणि गौतम भैया आले की केवळ त्यांची फलंदाजीच बघायची असं ठरलेलं असायचं.

गौतम भैयांसोबत खेळून व त्यांचा खेळ बघून आपण खूप काही शिकलोय. माझ्या मते ते फिरकीचे उत्तम खेळाडू आहेत. ते माझे प्रेरणास्थान आहेत त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात दिल्लीसाठी रणजी पदार्पणाची संधी मिळाली तेव्हा खूप आनंद झाला होता. पदार्पणाच्या सामन्यावेळी गौतम भैयांनी खांद्यावर हात ठेवून इतर जे सामने तू खेळलाय ना, अंडर 19, अंडर 16 तसाच हा सामना आहे असं समज आणि तुझा नैसर्गिक खेळ कर, असं त्यांनी सांगितलं होतं. पुढे जाऊन गौतम भैया माझ्या नेतृत्वात खेळले हा मी माझा बहुमान समजतो असे नितीशने आठवणीत रमताना सांगितलं.

गौतम गंभीर यांच्यामूळेच आपण कोलकाता नाईट रायडर्सकडेही आलो आणि आपण काही करु शकतो हा आत्मविश्वास असल्यानं यशस्वी ठरल्याचं तो सांगतो. आयपीएलमध्ये खेळण्याआधी बॅकफूटवर खेळायचे तंत्र कच्चे होते कारण दिल्ली क्रिकेटमध्ये सहसा फ्रंटफूटवर खेळण्यात आणि चेंडू ड्राईव्ह व कट करण्यावरच जोर असतो पण आयपीएलमध्ये यशस्वी व्हायचं असेल तर  बॅकफूटवर खेळायचे तंत्र सुधारावं लागेल हे लक्षात आले आणि त्यासाठी अभिषेक नायरची फार मदत झाल्याचे त्याने म्हटले आहे. आपले प्रेरणास्थान गौतम गंभीर यांच्या शेवटच्या रणजी सामन्यात आपण त्यांच्यासोबत खेळू शकलो नाही ही आपली सर्वात मोठी खंत आहे असे तो मानतो.     

टॅग्स :कोलकाता नाईट रायडर्सआयपीएल २०२१