जयपूर, आयपीएल 2019 : भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार आणि राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेला रविवारी सवाई मान सिंह स्टेडियमबाहेर अर्धा तास ताटकळत उभे रहावे लागले. राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि राजस्थान राज्य क्रीडा परिषद यांच्यातील वादामुळे स्टेडियमला टाळ असल्यामुळे रहाणेवर हा प्रसंग ओढावला.
रहाणेसह
राजस्थान रॉयल्सचे काही खेळाडू सरावासाठी स्टेडियमबाहेर आले होते, परंतु स्टेडियमला टाळं होतं. त्यामुळे खेळाडूंचा सरावाचा बराच वेळ स्टेडियमबाहेर उभे राहण्यातच वाया गेला. अखेर फ्रेंचायझींच्या अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली आणि खेळाडूंना सराव करण्याची संधी मिळाली.
‘‘राजस्थान क्रिकेट असोसिएशन आणि राजस्थान राज्य क्रीडा परिषद यांच्यात पैशांच्या मुद्दय़ावरून वाद सुरूच असतात. राज्य क्रिकेट संघटनेच्या अध्यक्षपदी ललित मोदी असल्यापासून हे वाद सुरू होते. आयपीएल सुरु होण्च्यापूर्वीच संघ मालकांकडून सर्व देणी दिली जातात. पैसे भरल्यानंतरही हा प्रकार घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे,’’ असे राजस्थान रॉयल्सच्या पदाधिकाऱ्याने सांगितले.
राजस्थान क्रिकेट असोसिएशनचे सहसचिव महेंद्र नाहर यांनी सांगितले की,‘‘शुक्रवारी काही अनोळखी व्यक्ती राजस्थान संघाचे सराव शिबीर सुरू असताना स्टेडियमच्या आत आले होते, त्यामुळेच हा प्रकार घडला.’’
राजस्थानचा पहिला सामना सोमवारी किंग्स इलेव्हन पंजाबशी होणार आहे.