हैदराबाद, आयपीएल 2019 : विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ आयपीएलच्या 12व्या मोसमात पहिल्या विजयाच्या शोधात आहे. रविवारी त्यांना सनरायझर्स हैदराबादचा सामना करावा लागणार आहे. बंगळुरूला आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यांत पराभव पत्करावा लागला आहे, तर हैदराबादने दोन सामन्यांत एक विजय मिळवला आहे. हैदराबादने मागच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे 199 धावांचे लक्ष्य सहज पार केले होते आणि त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास चांगलाच उंचावला आहे. बंगळुरूच्या तगड्या फलंदाजांसमोर त्यांना निभाव कसा लागतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. पण, रविवारचा दिवस बंगळुरूच्या बाजूनं नसल्याचं इतिहास सांगतो. त्यामुळेच कोहलीची चिंता वाढली आहे.
आजच्या या सामन्यातील लक्षवेधी ठरणारे खेळाडू विराट कोहली : बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीनं मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात 46 धावांची खेळी केली होती. त्याच्याकडून यापेक्षा अधिक मोठ्या खेळीची अपेक्षा आहे आणि ती हैदराबादविरुद्धच्या सामन्यात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
रशीद खान : ट्वेंटी-20 फॉरमॅटमधील सर्वात प्रभावशाली फिरकी गोलंदाज म्हणून अफगाणिस्तानचा रशीद खान ओळखला जातो. तो हैदराबाद संघाचा हुकूमी एका आहे आणि RCB साठी तो डोकेदुखी ठरू शकतो.
शिमरोन हेटमायर : इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शिमरोन हेटमायरला अद्याप सूर सापडलेला नाही. मात्र, ट्वेंटी-20 फॉरमॅटमध्ये चौकार-षटकारांची आतषबाजी करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे.
युजवेंद्र चहल : RCB चा प्रमुख गोलंदाज युजवेंद्र चहलने मुंबई इंडियन्सविरुद्ध चार विकेट्स घेत ऑरेंज कॅप शर्यतीत आघाडी घेतली आहे. हैदराबादच्या तगड्या फलंदाजांना तो झटपट गुंडाळू शकतो.
हैदराबादचा संभाव्य संघ : जॉनी बेअरस्टो, डेव्हिड वॉर्नर, केन विलियम्सन, विजय शंकर, मनीष पांडे, युसूफ पठाण, रशीद खान, शाहबाज नदीम, भुवनेश्वर कुमार, सिद्घार्थ कौल, खलील अहमद.
रॉयल चॅलेंजर बंगळुरू : पार्थिव पटेल, विराट कोहली, मोईन अली, एबी डिव्हिलियर्स, शिमरोन हेटमायर, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, टीम साऊदी, उमेश यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज.
रविवारचे अशुभ चक्र...
- आयपीएलमध्ये हैदराबाद आणि बंगळुरू यांच्यात 12 सामने झाले त्यात हैदराबादनं 7 सामने जिंकले
- राजीव गांधी स्टेडियमवरील 6 पैकी 5 सामन्यांत हैदराबादनं बंगळुरूच्या संघाला पराभवाची चव चाखवली
- मागील 10 सामन्यांत हैदराबादने 6, तर बंगळुरूने 4 विजय मिळवले आहेत
- रविवारी हे संघ चौथ्यांदा एकमेकांसमोर येणार आहेत, यापूर्वी झालेल्या तीन सामन्यांत हैदराबादने दोन विजय मिळवले.