Join us  

IPL 2019 : 'किंग खान'नंतर बाहुबलीकडून आंद्रे रसेलच्या खेळीचं कौतुक, म्हणाला...

IPL 2019 : आंद्रे रसेलच्या वादळासमोर 205 धावाही कमी पडतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2019 1:56 PM

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : आंद्रे रसेलच्या वादळासमोर 205 धावाही कमी पडतात, याची प्रचिती पुन्हा एकदा आली. दोनशेपल्ल्याड धावा केल्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा कर्णधार विराट कोहली विजय आपलाच, या गोड स्वप्नात होता. पण, कोलकाता नाइट रायडर्सच्या रसेलनं त्याच्या स्वप्नांचा चुराडा केला. रसेलने 13 चेंडूंत 7 खणखणीत षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने नाबाद 48 धावा केल्या. कोलकाताने 206 धावांचे लक्ष्य पाच चेंडू व पाच विकेट राखून पार करत अविश्वसनीय विजय मिळवला. 

बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियममधील रसेलच्या या तुफानी खेळीवर कोलकाताचा सह मालक शाहरुख खानने तोंडभरून कौतुक केले. त्याने बाहुबलीच्या शैलीत रसेलचे कौतुक करताना सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला. त्याने लिहीले की,'' कोलकाता संघाने सर्वोत्तम खेळ केला. ख्रिस लीन, नीतीश राणा, रॉबिन उथप्पा यांचीही फलंदाजी कौतुकास्पद होती. पण, रसेलचा हा फोटो या कौतुकांपलीकडचा आहे, याच्याशी तुम्हीही सहमत असाल.'' बाहुबली चित्रपटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरूनही शाहरुख खानच्या त्या ट्विटची दखल घेतली गेली आणि त्यांनीही रसेलचे कौतुक केले. कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि पार्थिव पटेल यांच्या खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने 205 धावा कुटल्या. पण कोलकाता नाइट रायडर्सने कोहलीला तणावात ठेवले होते. पवन नेगीने बंगळुरुच्या कर्णधाराचे टेंशन कमी केले, परंतु अन्य गोलंदाजांकडून त्याला योग्य साथ मिळाली नाही.  आंद्रे रसेलने पुन्हा एकदा फिनिशरची भूमिका पार पाडली. त्याच्या फतकेबाजीच्या जोरावर कोलकाताने 5 विकेट राखून सामना जिंकला. रसेलने 13 चेंडूंत 7 षटकार आणि 1 चौकार खेचून 48* धावा केल्या. 

इंडियन प्रीमिअर लीगच्या या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कोहलीनं विक्रमांचे डोंगर उभे केले. त्याला पार्थिव पटेल व एबी डिव्हिलियर्स यांची उत्तम साथ लाभली. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 205  धावा केल्या होत्या. 

टॅग्स :आयपीएल 2019कोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशाहरुख खानबाहुबली