Join us  

IPL 2019 RCB vs KKR : बंगळुरूच्या फलंदाजांना सूर गवसला, KKR समोर 206 धावांचे आव्हान

IPL 2019 RCB vs KKR: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकाता नाइट रायडर्सवर काढला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2019 9:26 PM

Open in App

बंगळुरू, आयपीएल 2019 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी सलग चार सामन्यांत झालेल्या पराभवाचा राग कोलकाता नाइट रायडर्सवर काढला. इंडियन प्रीमिअर लीगच्या या सामन्यात बंगळुरूच्या फलंदाजांनी जोरदार फटकेबाजी केली. कर्णधार विराट कोहलीनं विक्रमांचे डोंगर उभे केले. त्याला पार्थिव पटेल व एबी डिव्हिलियर्स यांची उत्तम साथ लाभली. बंगळुरूने निर्धारीत 20 षटकांत 3 बाद 205 धावा केल्या. 

पटेलने दुसऱ्याच चेंडूवर चौकार मारताना आपला फॉर्म कायम असल्याचे दाखवून दिले. कोहलीनेही अखेरच्या दोन चेंडूवर खणखणीत चौकार खेचले. बंगळुरूने पहिल्याच षटकात 13 धावा जोडल्या. पियुष चावलाने दुसऱ्याच षटकात बंगळुरूच्या धावांवर लगाम लावताना केवळ सात धावा दिल्या. पॉवर प्लेमध्ये बंगळुरूने बिनबाद 53 धावा केल्या. त्यात कोहलीच्या 29 आणि पटेलच्या 24 धावांचा समावेश होता. कोहलीनं 17 वी धाव घेताच कोहलीनं ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावांचा पल्ला पार केला. अशी कामगिरी करणारा तो ख्रिस गेल नंतर दुसरा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. त्याने 30 वर्षे व 151 दिवसांत त्याने हा पल्ला गाठला. ट्वेंटी-20त 8000 धावा करणारा कोहली हा सातवा फलंदाज आहे आणि सुरेश रैनानंतर दुसरा भारतीय फलंदाज आहे. नीतिश राणाने कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्याने पटेलला 25 धावांवर पायचीत केले. पटेलने 24 चेंडूंत 3 चौकारांच्या मदतीने 25 धावा केल्या होत्या. विराट कोहलीने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर कट शॉट मारून चौकार खेचला. त्याच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. आयपीएलमधील त्याचे हे 39वे अर्धशतक ठरले. आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतक झळकावणाऱ्या फलंदाजांत डेव्हिड वॉर्नर ( 42) आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ गौतम गंभीर ( 36), सुरेश रैना ( 36) आणि रोहित शर्मा ( 35) यांचा क्रमांक येतो. कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या जोडीनंही दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या जोडीनं आंद्रे रसेलच्या एका षटकात 16 धावा चोपून अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. डिव्हिलियर्सने दोन खणखणीत षटकार खेचले. कोहलीनं आयपीएलमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही नावावर केला. त्याने सुरेश रैनाचा 5086 धावांचा टप्पा ओलांडला. बंगळुरूने 15 षटकांत 1 बाद 142 धावा केल्या. डिव्हिलियर्सनेही 28 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. त्याने 4 चौकार व 3 षटकार खेचले. कोहली आणि डिव्हिलियर्स या जोडीनं बंगळुरूला मोठी धावसंख्या गाठून दिली. आयपीएलमध्ये सर्वाधिक शतकी भागीदारी करणाऱ्या खेळाडूंमध्ये या दोघांनी आघाडी मिळवली. कोहली व डिव्हिलियर्स यांच्यात 9 शतकी भागीदारी झाल्या आहेत. कुलदीप यादवने 18 व्या षटकात ही जोडी फोडली. 49 चेंडूंत 9 चौकार व 2 षटकार खेचून 84 धावा करणाऱ्या कोहलीला त्यानं बाद केले. डिव्हिलियर्सने 32 चेंडूंत 63 धावा केल्या. त्यात 5 चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. त्याला नरीनने बाद केले. 

टॅग्स :आयपीएल 2019रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरकोलकाता नाईट रायडर्सविराट कोहलीएबी डिव्हिलियर्स