Join us  

IPL 2019 : राजस्थानचा 198 धावांचा डोंगर, सॅमसनची फटकेबाजी

IPL 2019: अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने 198 धावा चोपल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 9:35 PM

Open in App

हैदराबाद, आयपीएल 2019 : अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध 198 धावा चोपल्या. रहाणे व सॅमस या दोघांनी वैयक्तीक अर्धशतक झळकावले. रहाणे 70 धावांवर माघारी परतला, तर सॅमसनने नाबाद 102 धावा चोपताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. 

नाणेफेक जिंकून राजस्थान रॉयल्सने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला, परंतु चौथ्याच षटकात त्यांना धक्का बसला. राजस्थानचा सलामीवीर जोस बटलरला मोठी खेळी करण्यापासून हैदराबादच्या रशीद खानने रोखले. त्याने गुगली चेंडू टाकून बटलरचा त्रिफळा उडवला. आयपीएलमध्ये रशीदने चौथ्यांदा बटलरची विकेट घेतली आहे. विशेष म्हणजे बटलरने रशीदच्या केवळ दहा चेंडूंचा सामना केला आहे आणि त्याला 10 धावा करता आल्या. त्याच्या विकेटमुळे राजस्थानला पॉवर प्लेमध्ये 36 धावा करता आल्या. 

मात्र, या दोघांनी संयमी खेळी करताना संघाला सुस्थितीत आणले. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना संघाला 10 षटकांत 75 धावांपर्यंत मजल मारून दिली. यासह रहाणे आणि सॅमसन या जोडीनं आयपीएलमध्ये 750 धावांचा पल्ला पार केला. रहाणने 38 चेंडूंत अर्धशतक पूर्ण करताना संघाला मजबूत धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. त्याच्या या खेळीत दोन षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. त्यापाठोपाठ सॅमसन यानेही अर्धशतक झळकावले. त्याने 35 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांच्या मदतीने पन्नास धावा केल्या. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारीही पूर्ण केली.

अजिंक्य रहाणेची खेळी 15.5 षटकात संपुष्टात आली. शाहबाद नदीमच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारणाऱ्या रहाणेचा झेल पांडेने टिपला. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. 17 व्या षटकात सॅमसनला जीवदान मिळाले. सॅमसनने भुवनेश्वर कुमारने टाकलेल्या 18 व्या षटकात 24 ( 4 चौकार व 1 षटकार व दोन धावा) धावा चोपल्या. त्याच्या या फटकेबाजीच्या जोरावर राजस्थानने मोठी धावसंख्या उभारली. 

टॅग्स :आयपीएल 2019राजस्थान रॉयल्ससनरायझर्स हैदराबादअजिंक्य रहाणे