चेन्नई, आयपीएल 2019 : कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्स संघाने रविवारी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स संघाचा पराभव केला. चेन्नईच्या 175 धावांचा पाठलाग करताना राजस्थानला निर्धारित 20 षटकांत 8 बाद 167 धावांपर्यंतच मजल मारता आली. या सामन्यात धोनीने इंडियन प्रीमिअर लीगमधील 21वे अर्धशतक पूर्ण केले. धोनीने नाबाद 75 धावा करताना आयपीएलमधील दुसरी सर्वोत्तम वैयक्तीक आणि चेपॉकवरील सर्वोत्तम खेळीची नोंद केली.
राजस्थानने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकाराले आहे. त्यामुळे या सामन्यात चेन्नईला प्रथम फलंदाजी करावी लागणार आहे. राजस्थानच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला. त्यामुळे चेन्नईचे तीन फलंदाज फक्त 27 धावांत बाद झाले. पण त्यानंतर मात्र धोनी आणि सुरेश रैना यांनी संघाला सावरले. रैनाने 32 चेंडूंत 36 धावा केल्या. या दोघांनी 61 धावांची भागीदारी केली. रैना बाद झाल्यानंतर धोनीनं फटकेबाजी केली. त्याने सामना केलेल्या अखेरच्या 12 चेंडूंत तब्बल 42 धावा चोपल्या. त्यात चार षटकार व दोन चौकारांचा समावेश होता. त्याच्या या खेळीमुळे चेन्नईने 175 धावांपर्यंत मजल मारली. आयपीएलमधील धोनीचे हे 21वे अर्धशतक ठरले, तर त्याने चौथ्यांदा 70पेक्षा अधिक धावा करताना लोकेश राहुलला मागे टाकले.
आयपीएलमधील धोनीची सर्वोत्तम खेळी
79* वि. किंग्स इलेव्हन पंजाब, मोहाली 2018
75* वि. राजस्थान रॉयल्स, चेन्नई 2019
70* वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2018
70* वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 2011
धोनीने ड्वेन ब्राव्होसह 56 धावांची भागीदारी केली. चेन्नईच्या 176 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानची सुरुवात चांगली झाली नाही. राजस्थानचा कर्णधार अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाला. त्यानंतर राजस्थानने 14 धावांत अजून दोन फलंदाज गमावले. पण त्यानंतर राहुल त्रिपाठी (39) आणि स्टीव्हन स्मिथ (28) यांनी राजस्थानचा डाव सावरला. पण हे दोघे बाद झाल्यावर बेन स्टोक्सने संघाचे आव्हान जीवंत ठेवण्याचा प्रयत्न केला. अखेरच्या षटकामध्ये स्टोक्सच्या रुपात राजस्थानला मोठा धक्का बसला. स्टोक्सने 26 चेंडूंत 46 धावा केल्या. चेन्नईने सहा गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले.