Join us  

IPL 2019 : माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येतोय रिषभ पंत...

आपण दिलेले चॅलेंज पंत पूर्ण करणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 6:35 PM

Open in App

मुंबई, आयपीएल 2019 : आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला एक चॅलेंज देण्यात आले होते. धोनीला हे चॅलेंज दिले होते ते युवा यष्टीरक्षक रिषभ पंतने. आज चेन्नई आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना रंगणार आहे. त्यामुळे आपण दिलेले चॅलेंज पंत पूर्ण करणार का, याची उत्सुकता साऱ्यांनाच असेल.

भारतीय क्रिकेट संघात धोनीचा वारसदार म्हणून पंतकडे पाहिले जात आहे. पंतनेही अल्पावधीतच सातत्यपूर्ण कामगिरी करून संघातील स्थान पक्के केले आहे. त्यामुळे धोनीच्या अनुपस्थितीत पर्यायी यष्टिरक्षक म्हणून दिनेश कार्तिकऐवजी पंतची निवड करण्यात आलेली आहे. वर्ल्ड कप संघातही धोनीला राखीव यष्टिरक्षक म्हणून पंतच्याच नावाचा विचार होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळेच पंतने थेट माहीला चॅलेंज दिले होते. पंतने एक व्हिडीओ ट्विट करून थेट धोनीला आव्हान केले होते.

चॅलेंज देताना पंत म्हणाला होता की, " माही भाई हे मला गुरू समान आहेत. तो नसता तर मी यष्टिरक्षक-फलंदाज झालो नसतो. पण, यावेळी त्याच्या संघाविरुद्ध मी अशी फटकेबाजी करेन की, कॅप्टन कूल माही कूल राहणार नाही. माही भाई तयार राहा, खेळ दाखवायला येत आहे. "

दिल्ली कॅपिटल्सच्या रिषभ पंतची तुफानी खेळी वानखेडेवर पाहायला मिळाली. पंतने फक्त २६ चेंडूंमध्ये सात चौकार आणि सात षटकारांच्या जोरावर नाबाद ७८ धावांची खेळी साकारली. पंतच्या या दमदार खेळीच्या जोरावर दिल्लीला मुंबई इंडियन्सविरुद्धच्या पहिल्या सामन्यात २१३ धावा करता आल्या होत्या.

चेन्नई सुपर किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांनी इंडियन प्रीमिअर लीगमध्ये पहिल्याच सामन्यात विजय मिळवत धडाक्यात सुरूवात केली. चेन्नईने विराट कोहलीच्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूचा, तर दिल्लीनं रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा पराभव केला. पण, चेन्नईला विजयासाठी 71 धावाच करायच्या होत्या, तर दिल्लीनं 213 धावा चोपल्या. त्यामुळे आज फिरोज शाह कोटलावर होणाऱ्या सामन्यात चेन्नईचे गोलंदाज विरुद्ध दिल्लीचे फलंदाज असे युद्ध पाहायला मिळेल. दिल्लीच्या रिषभ पंतने मुंबईच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेत 27 चेंडूंत 78 धावा चोपल्या होत्या. पंतचे हे वादळ रोखण्यासाठी चेन्नईचे अकरा शिलेदार सज्ज आहेत.

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीरिषभ पंतचेन्नई सुपर किंग्सआयपीएल 2019