Join us  

IPL 2019 : मोइन अलीनं धु धु धुतलं अन् कुलदीप यादव रडू लागला

IPL 2019 : अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स संघावर 10 धावांनी विजय मिळवला

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 12:24 PM

Open in App

कोलकाता, आयपीएल 2019 : अटीतटीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आयपीएलमध्ये शुक्रवारी कोलकाता नाइट रायडर्स संघावर 10 धावांनी विजय मिळवला. आंद्रे रसेल नावाचे वादळ अखेरच्या षटकात थोपावण्यात बंगळुरूला यश आले आणि त्यामुळेच कर्णधार विराट कोहलीला यंदाच्या मोसमातील दुसऱ्या विजयाची चव चाखता आली. कोहलीनं सामन्यातील अखेरचे षटक टाकण्यासाठी अलीला पाचारण केले आणि अलीनं तो निर्णय योग्य ठरवला. अलीनं अखेरच्या षटकात 13 धावा देत कोलकाताला हार मानण्यास भाग पाडले. याच अलीनं फलंदाजीतही कोलकाताच्या गोलंदाजांची धुलाई केली होती. कुलदीप यादव हा अलीच्या फटकेबाजीचा सर्वात सोपा शिकार ठरला. त्यामुळेच कुलदीपला भर मैदानात अश्रु अनावर झाले. 

मोइन अली आणि विराट कोहली यांच्या जोरदार आतषबाजीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने शुक्रवारी खेळलेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सविरुद्ध 4 बाद 213 धावा चोपल्या. अली व कोहली यांनी  तिसऱ्या विकेटसाठी झटपट 90 धावांची भागीदारी केली. अलीने 28 चेंडूंत 5 चौकार व 6 षटकार खेचून 66 धावा केल्या. कोहलीनेही 58 चेंडूंत 100 धावा केल्या. त्यात 9चौकार व 4 षटकारांचा समावेश होता. अलीने खेळपट्टीवर स्थिरस्थावर होण्यासाठी फार वेळ न घेता फटकेबाजी सुरू केली. या फटकेबाजीमुळे कोहली व अली यांनी 21 चेंडूंत अर्धशतकी भागीदारी केली. कोहलीने 40 चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. त्यात 4 चौकार व 1 षटकाराचा समावेश होता. 

पुढच्याच षटकात अलीनेही अर्धशतक पूर्ण केले. त्याने 24 चेंडूंत ही अर्धशतकी खेळी केली. त्याने कुलदीपने टाकलेल्या 16व्या षटकात 27 धावा चोपल्या, परंतु त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर तो बाद झाला. कुलदीपने अलीला बाद करण्यात यश मिळवले, परंतु तो या सामन्यात सर्वात महागडा गोलंदाज ठरला. कुलदीपने चार षटकांत 59 धावा दिल्या. आयपीएलमध्ये फिरकीपटूने दिलेल्या या सर्वाधिक धावा ठरल्या. इम्रान ताहीरने 2016मध्ये मुंबई इंडियन्सविरुद्ध 59 धावा दिल्या होत्या. 

बंगळुरूने विजयासाठी ठेवलेल्या 214 धावांच्या प्रत्युत्तरात कोलकाता नाइट रायडर्सला 5 बाद 203 धावांपर्यंतच मजल मारता आले. नितीश राणा (85* ) आणि आंद्रे रसेल (65 ) यांचा संघर्ष अपयशी ठरला.  

टॅग्स :आयपीएल 2019कुलदीप यादवकोलकाता नाईट रायडर्सरॉयल चॅलेंजर्स बेंगलोर