कोलकाता : राजस्थान रॉयल्सविरुद्ध गुरुवारी कोलकाता नाईट रायडर्स लय मिळवून विजयीपथावर पोहोचण्यास इच्छुक असेल. केकेआरला सलग पाच पराभवांचा सामना करावा लागला. त्यामुळे आंद्रे रसेलवरील विसंबून राहण्याची त्यांची वृत्ती चव्हाट्यावर आली. कर्णधार दिनेश कार्तिक याला टीकेचा धनी व्हावे लागले. प्रशिक्षक जॅक कालिस म्हणाले,‘माझ्या मते, काही खेळाडू हताश झाल्यामुळे त्यांना विश्रांतीची गरज आहे. कार्तिक दिवसभरासाठी घरी जाऊन आल्यामुळे नव्या ऊर्जेसह खेळण्यास सज्ज झाला आहे.’ पहिल्या मोसमात केकेआरने रॉयल्सला सहजपणे नमविले होते, पण ती परिस्थिती आता बदलली. यासाठी गोलंदाजांची नीरस कामगिरी जबाबदार आहे. इडनच्या खेळपट्टीवर फिरकीपटूंंूनी निराश केले. हेच गोलंदाज २०१२ आणि २०१४ च्या मोसमात संघाची ताकद होते. कुलदीप यादव, सुनील नरेन आणि पीयूष चावला यांनी १० सामन्यात केवळ १६ गडी बाद केले. वेगवान गोलंदाजही फारसा चमत्कार घडवू शकले नाहीत. केकेआर सातव्या स्थानावर असून, राजस्थानची वाटचालही डळमळीत झाली आहे.