Join us  

IPL 2019 : हैदराबादने चाखली विजयाची चव; संजू सॅमसनचे शतक व्यर्थ 

सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या १२ व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2019 11:43 PM

Open in App

हैदराबाद, आयपीएल २०१९: सनरायझर्स हैदराबाद संघाने आयपीएलच्या १२ व्या हंगामात पहिल्या विजयाची चव चाखली. डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी रचलेल्या मजबूत पायामुळे हैदराबादने राजस्थान रॉयल्सवर विजय मिळवला. विजयाच्या उंबराठ्यावर असताना हैदराबादला तीन धक्के बसले, परंतु त्यांनी राजस्थानवर मात करण्यात यश मिळवले. हैदराबादने हा सामना 5 विकेट राखून जिंकला. 

अजिंक्य रहाणे व संजू सॅमसन यांच्या शतकी भागीदारीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने इंडियन प्रीमिअर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध 198 धावा चोपल्या. रहाणे व सॅमस या दोघांनी वैयक्तीक अर्धशतक झळकावले. रहाणे 70 धावांवर माघारी परतला, तर सॅमसनने नाबाद 102 धावा चोपताना चौकार-षटकारांची आतषबाजी केली. सॅमसनने 55 चेंडूंत 10 चौकार व 4 षटकार खेचले. रहाणेने 49 चेंडूंत 70 धावा केल्या आणि त्यात 4 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. 

सनरायझर्स हैदराबादच्या डेव्हिड वॉर्नरने पहिल्या षटकापासूनच राजस्थानच्या गोलंदाजांवर प्रहार केला. धवल कुलकर्णीच्या पहिल्याच चेंडूवर चौकार खेचून त्यानं आपला इरादा स्पष्ट केला. त्यानंतर त्याने एक खणखणीत षटकारही खेचला आणि हैदराबादने पहिल्या षटकात 14 धावा केल्या. पॉवर प्लेमध्ये हैदराबाद संघाने एकही विकेट न गमावता 69 धावा केल्या. डेव्हिड वॉर्नरने 27 चेंडूंत 52 धावा, तर जॉनी बेअरस्टोने 9 चेंडूंत 16 धावा केल्या. 10 व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर वॉर्नर बाद झाला. बेन स्टोक्सने 37 चेंडूंत 69 धावा करणाऱ्या वॉर्नरला धवल कुलकर्णीकरवी झेलबाद केले. वॉर्नरने 9 चौकार व 2 षटकार खेचले. पुढच्याच चेंडूवर धवलने बेअरस्टोचा सोपा झेल सोडला. परंतु, त्याची भरपाई पुढच्याच षटकात त्यानं केली, त्यानं अशक्यप्राय झेल घेत बेअरस्टोवला 48 धावांवर माघारी पाठवले.  बेअरस्टोने 28 चेंडूंत 1 षटकार व 6 चौकार लगावत 48 धावा केल्या. वॉर्नर आणिबेअरस्टो यांनी रचलेल्या मजबूत पायावर हैदराबादच्या अन्य फलंदाजांनी विजयी कळस चढवला.

टॅग्स :आयपीएल 2019