चेन्नई, आयपीएल 2019 : गतविजेता चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीगच्या 12व्या मोसमातील पहिल्याच सामन्या रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरूवर 7 विकेट राखून सोपा विजय मिळवला. स्टार फलंदाजांची फौज असलेल्या बंगळुरू संघाला 70 धावाच करता आल्या आणि संथ खेळपट्टीवर धोनीने आखलेली रणनीती यशस्वी ठरली.
नाणेफेकीचा कौल पारड्यात पडताच धोनीनं बंगळुरूला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. पहिल्या 8 षटकांत बंगळुरूची अवस्था 4 बाद 39 धावा अशी दयनीय झाली होती आणि येथेच बंगळुरूच्या हातून सामना निसटला होता. याचे श्रेय भारताचा अव्वल फिरकी गोलंदाज हरभजन सिंगला द्यावे लागेल. त्याने 4 षटकांत 20 धावा देताना 3 महत्त्वाच्या विकेट्स घेतल्या. यात कर्णधार विराट कोहलीचाही समावेश होता.
धोनीनं संथ खेळपट्टीवर भज्जीला खेळवून मास्टरस्ट्रोक मारला आणि पहिल्या 8 षटकांत भज्जीनं चार षटक टाकली. धोनीनं सामन्याच्या दुसऱ्याच षटकात भज्जीला पाचारण केले आणि भज्जीनं त्याच्या दुसऱ्या षटकात कोहलीला (6) बाद केले. त्यानंतर त्याने मोईन अली आणि एबी डिव्हिलियर्सचा अडथळा दूर केला. या तीन महत्त्वाच्या विकेट्समुळे बंगळुरूचा आत्मविश्वास डळमळीत झाला.
हरभजनचा आयपीएलमध्ये 'असाही' पराक्रम
आयपीएलमध्ये आतापर्यंत स्वत:च्याच गोलंदाजीवर सर्वाधिक झेल पकडणाऱ्या गोलंदाजांच्या यादीमध्ये हरभजनने अव्वल क्रमांक पटकावला आहे. पहिल्या सामन्यात हरभजनने मोईन अलीचा स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल पकडला. हरभजनने स्वत:च्याच गोलंदाजीवर हा अकरावा झेल पकडत इतिहास रचला आहे. हा पराक्रम करताना हरभजनने चेन्नईच्याच ड्वेन ब्राव्होला पिछाडीवर टाकले आहे. ब्राव्होने असा पराक्रम दहा वेळा केला होता.
आयपीएलमध्ये स्वत:च्याच गोलंदाजीवर झेल टिपणारे गोलंदाज
11 हरभजन सिंग
10 ड्वेन ब्रावो
7 सुनील नरिन
6 किरॉन पोलार्ड
पाच हजार धावा करणारा सुरेश रैना ठरला पहिला फलंदाज
या सामन्यात सुरेश रैना व कोहली यांच्यात प्रथम 5000 धावा करण्याची शर्यत रंगली आणि ती रैनाने जिंकली. आजच्या सामन्यात या दोघांपैकी कोण प्रथम 5000 धावा करणार यासाठी दोघेही आतुर होते. या शर्यतीत बाजी मारण्यासाठी रैनाला 15 धावांची गरज होती, तर कोहलीला 52 धावांची गरज होती. या सामन्यापूर्वी रैनाने 176 सामन्यांत 4985 धावा केल्या होत्या, तर कोहलीने 163 सामन्यांत 4948 धावा केल्या होत्या. या सामन्यात 19 चेंडूंत 15 धावा करत रैनाने ही शर्यत जिंकली. आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणार रैना हा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.