जयपूर : विजयी वाटेवर परतलेला मुंबई इंडियन्स लय कायम राखणार का, हा प्रश्न आहे. यजमान राजस्थान रॉयल्सविरुद्ध त्यांच्याच घरी विजय मिळविण्याचे मुंबईपुढे आव्हान आहे.
तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. ओळीने तीन पराभव पत्करल्यानंतर कर्णधार रोहित शर्माच्या ९४ धावांच्या बळावर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुवर ४६ धावांनी पहिला विजय मिळाला. विजयामुळे आत्मविश्वास उंचावलेला मुंबई संघ सवाई मानसिंग स्टेडियमवर विजयाच्या निर्धाराने खेळणार आहे. रोहितच्या सोबतीला वेस्ट इंडिजचा इव्हिन लुईस, किरोन पोलार्ड तसेच हार्दिक आणि कुणाल हे पांड्या बंधू विजयात मोलाची भूमिका बजावू शकतात. पोलार्ड संघात परतणे ही संघासाठी सुखद वार्ता आहे.
जसप्रीत बुमराहच्या मार्गदर्शनात मुंबईचे गोलंदाजही आत्मविश्वासाने मारा करीत असून कोहली आणि डिव्हिलियर्ससारख्या फलंदाजांना त्यांनी रोखले. माघारल्यानंतर मुसंडी मारण्यात मुंबई संघाचा हातखंडा असल्याचे आधीही सिद्ध झाले आहे.
दुसरीकडे यजमान संघाला शेन वाटसनच्या शतकी खेळीचा काल शॉक बसला. कर्णधार अजिंक्य रहाणे सहकाऱ्यांना कसा प्रेरणा देतो आणि त्यांच्यातील गुणांचा वापर कसा करून घेतो यावर राजस्थानच्या विजयाचे समीकरण ठरणार आहे. संजू सॅमसनने एका सामन्यात ९४ धावा ठोकल्या खºया पण अन्य सहकाºयांची त्याला साथ लाभली नाही. गोलंदाजीतही वेगवान जयदेव उनाडकट हा देखील अद्याप भेदक ठरलेला नाही. स्थानिक संघाला मेंटर आणि महान गोलंदाज शेन वॉर्नची उणीव जाणवत आहे. कौटुंबिक कामानिमित्त तो आॅस्ट्रेलियाकडे रवाना झाला आहे.
(वृत्तसंस्था)