पुणे : जगातील सर्वात चपळ आणि स्मार्ट यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीच्या नावावर लवकरच एक नवा विक्रम जमा होणाराय. शनिवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात धोनीनं मुरुगन अश्विनला यष्टीचीत करुन आयपीएलमधील सर्वाधिक यष्टीचीत करणारा यष्टीरक्षक होण्याच्या दिशेनं एक पाऊल पुढे टाकलंय. रॉबिन उथप्पा आणि धोनीच्या नावावर प्रत्येकी 32 फलंदाजांना यष्टीचीत केलंय. आयपीएलच्या यंदाच्या हंगामात उथप्पा यष्टीरक्षण करत नाहीय. त्यामुळे लवकरच हा विक्रम धोनीच्या नावावर जमा होऊ शकतो. महेंद्रसिंह धोनीच्या चपळ यष्टीरक्षणाची अनेकदा चर्चा होते. काही दिवसांपूर्वीच धोनीच्या यष्टीरक्षणाचं ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू माईक हसीनं तोंडभरुन कौतुक केलं होतं. यष्टीरक्षणाच्या बाबतीत धोनीचा हात कोणीच धरु शकणार नाही, असं हसीनं म्हटलं होतं. चेन्नईनं बंगळुरुच्या संघाला नमवल्यानंतर हसीनं धोनीच्या यष्टीरक्षणाची मुक्तकंठानं प्रशंसा केली. 'फिरकी गोलंदाजी सुरु असताना धोनी अप्रतिम कामगिरी बजावतो. याबाबतीत त्याची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. त्याचा वेग, हालचाली थक्क करुन टाकणाऱ्या आहेत,' अशा शब्दांमध्ये हसीनं धोनीचं तोंडभरुन कौतुक केलं होतं.'धोनी हा संघातील महत्त्वपूर्ण खेळाडू आहे. त्याचं यष्टीरक्षणाचं कौशल्य जबरदस्त आहे. यष्टीमागे तो करत असलेली कामगिरी महत्त्वाची आहे. त्याची फलंदाजीदेखील उत्तम आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मी त्याला अशा फॉर्ममध्ये पाहिलं नव्हतं,' अशा शब्दांमध्ये हसीनं धोनीवर स्तुतीसुमनांचा वर्षाव केला. गेले काही महिने धोनी फलंदाजी करताना चाचपडत होता. मात्र यंदाच्या आयपीएलमध्ये पुन्हा एकदा जुना धोनी पाहायला मिळतोय. यंदाच्या आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत धोनीचा समावेश पहिल्या खेळाडूंमध्ये होतो. त्यानं आतापर्यंत 10 सामन्यात 360 धावा केल्या आहेत.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- IPL 2018: लवकरच 'हा' विक्रम धोनीच्या नावावर जमा होणार
IPL 2018: लवकरच 'हा' विक्रम धोनीच्या नावावर जमा होणार
धोनी लवकरच रॉबिन उथप्पाचा विक्रम मोडीत काढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 14:43 IST