Join us  

IPL 2018 : रस्त्यावर शेंगदाणे विकणारा ' हा ' मुलगा ठरतोय चेन्नईच्या विजयाचा शिल्पकार

काही जण परिस्थितीपुढे कधीही हतबल होत नाहीत. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात ' अच्छे दिन ' येतात आणि ते स्वत: एक आख्यायिका बनून जातात...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2018 8:48 AM

Open in App

नवी दिल्ली : काही जण परिस्थितीपुढे कधीही हतबल होत नाहीत. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर त्यांच्या आयुष्यात ' अच्छे दिन ' येतात आणि ते स्वत: एक आख्यायिका बनून जातात... 'त्याची' गोष्टही अशीच. लहानपणी त्याने अठराविश्व दारीद्र्य अनुभवलं. दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असायची. त्यामुळे त्याने आपल्या भावासह रस्यावर शेंगदाणे विकायला सुरुवात केली. आणि आता तो आयपीएलमधील चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरतोय. लुंगी एनगिडी, हे त्याचं नाव, दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज.

आयपीएलच्या लिलावात एनगिडीला कुणी जास्त  'भाव '  देत नव्हते. त्याची मूळ किंमत होती 50 लाख आणि हीच किंमत मोजत चेन्नईने त्याला आपल्या संघात सामील करून घेतलं. एनगिडीने भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याच भारतात आता तो आयपीएल खेळत आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये त्याची चांगली कामगिरी झालेली आहे. आतापर्यंतच्या पाच सामन्यांमध्ये त्याने 9 बळी मिळवले आहेत.

पंजाबविरुद्धच्या सामन्यात तर एनगिडी हा चेन्नईसाठी नायक ठरला होता. कारण या सामन्यात त्याने धावांची टांकसाळ उघडलेल्या लोकेश राहुलला बाद केले, त्याचबरोबर तुफानी फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेल्या ख्रिस गेलचा काटाही त्याने काढला. पंजाबचा कर्णधार आर. अश्विनला त्याने तंबूचा रस्ता दाखवला तर अॅण्ड्रयू टायलाही बाद केले. या चार फलंदाजांना बाद करत एनगिडीने पंजाबचे कंबरडे मोडले होते. आता बाद फेरीत त्याच्याकडून कशी कामगिरी होते, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले असेल.

टॅग्स :आयपीएल 2018क्रिकेटचेन्नई सुपर किंग्सआयपीएल