ठळक मुद्देधोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलची दोन विजेतेपद मिळवली होती. आयपीएलमध्ये खेळाडू कायम ठेवण्याचे धोरण, वेतन, खेळाडूंसाठी नियम आणि अन्य मुद्यांवर चर्चा झाली.
नवी दिल्ली - आयपीएलच्या पुढच्या मोसमात पुनरागमन करणा-या चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स या दोन संघांना त्यांचे तीन प्लेयर्स परत मिळणार आहेत. आयपीएलच्या संचालन परिषदेने या दोन संघांना त्यांचे तीन जुने खेळाडू कायम ठेवण्याची परवानगी दिली आहे. सट्टेबाजी प्रकरणातील सहभागामुळे या दोन संघांवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती.
या निर्णयामुळे महेंद्रसिंह धोनीचा चेन्नई सुपर किंग्जकडून खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नईने आयपीएलची दोन विजेतेपद मिळवली होती. नवी दिल्लीत बुधवारी क्रिकेट प्रशासन समिती आणि आयपीएलच्या संचालन परिषदेची बैठक झाली. या बैठकीत आयपीएलमध्ये खेळाडू कायम ठेवण्याचे धोरण, वेतन, खेळाडूंसाठी नियम आणि अन्य मुद्यांवर चर्चा झाली.
2015 साली संघात असणा-या तीन क्रिकेटपटूंना कायम ठेवण्याची परवानगी चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्सला दिली आहे. प्रत्येक फ्रेंचायजीला आपल्या संघात जास्तीत जास्त 25 आणि कमीत कमी 18 खेळाडू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
चेन्नई आणि राजस्थान या दोन्ही संघातील खेळाडू रायजिंग पुणे सुपरजायंटस आणि गुजरात लायन्स या संघांकडून खेळतात. पुणे आणि गुजरात संघांमध्ये असलेले काही खेळाडू चेन्नई आणि राजस्थानला परत मिळू शकतात अशी दोन महिन्यांपासून चर्चा होती.
धोनीचे चेन्नई संघाबरोबर जे नाते आहे तसे नाते पुण्याच्या संघाबरोबर दोनवर्षात जमू शकले नाही. यावर्षीच्या आयपीएलच्या मोसमात पुणे संघाचे मालक हर्ष गोयंका यांनी धोनीच्या कामगिरीवरुन त्याला लक्ष्य केले होते. त्याच्यापेक्षा पुण्याचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ किती सरस आहे अशी टि्वटरवरुन टीकाही केली होती.
आयपीएलच्या सुरूवातीला पुण्याच्या मुंबईवरील पहिल्या विजयानंतर हर्ष गोयंका यांनी धोनीच्या चाहत्यांचा रोष ओढवून घेतला होता. मॅच विनिंग खेळी करणा-या स्मिथचं त्यांनी कौतूक केलं होतं. यावेळी त्यांनी, "स्मिथने दाखवून दिलं कोण आहे जंगलचा राजा, आपल्या कामगिरीने त्याने धोनीला पूर्णतः झाकोळलं, स्मिथची कर्णधारपदी निवड करण्याचा निर्णय योग्यच होता" असं ट्विट केलं होतं. त्यांच्या या ट्विटनंतरही धोनीच्या चाहत्यांनी गोयंका यांना चांगलंच धारेवर धरलं होतं. वाढती टीका पाहून गोयंका यांनी ते ट्विट नंतर डिलीट केलं.