सचिन कोरडे : गोव्यातील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अडथळ्यांची शर्यत काही केल्या संपत नाही. मार्च-एप्रिलमध्ये ठरलेली ही स्पर्धा निवडणुकीची आचारसंहिता, सुरक्षा व्यवस्था, विद्यार्थ्यांच्या परीक्षा आणि स्वयंसेवकांची कमतरता या कारणांमुळे पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने भारतीय आॅलिम्पिक संघटने(आयओए)ला केली होती. या विनंतीवर ‘आयओए’तील वरिष्ठ मंडळी नाराज झाली होती. गोवा सरकारने पुढे केलेली कारणे खरंच संवेदनशील आहेत की नाहीत याची पडताळणी करण्यासाठी आयओएचे महासचिव राजीव मेहता गोव्यात आले होते. त्यांची मने वळविण्यात सरकार यशस्वी ठरले. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या मंगळवारच्या बैठकीनंतर आता स्पर्धा नोव्हेंबरमध्ये होईल, असा प्राथमिक निर्णय घेण्यात आला. आता आयओएच्या बैठकीत यावर अंतिम निर्णय होईल, असे सूत्रांनी सांगितले.
गोव्यात होणाºया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. मात्र, या स्पर्धेच्या तयारीबाबत ज्या घडामोडी घडत आहेत त्याने मात्र आयओएतील विविध राज्य संघटनांचे सदस्य नाराज आहेत. ही स्पर्धा अन्यथा हलवावी किंवा रद्द करावी, अशी भूमिका काही सदस्यांची आहे. कारण, गोव्याने आतापर्यंत चार-पाच वेळा स्पर्धा पुढे ढकलली आहे. त्यातच २०२० मध्ये आॅलिम्पिक स्पर्धाही आहेत. या स्पर्धेची तयारी करण्यासाठी खेळाडू व्यस्त असतील. त्यामुळे आॅलिम्पिकपूर्वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा होणे महत्त्वाचे आहे. दुसरीकडे, आगामी लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर पावसाळी हंगाम पाहाता गोव्यापुढे आॅॅक्टोबर-नाव्हेंबरशिवाय पर्याय नाही. हा विचारही करण्यात आला. त्यामुळे गोव्याला मुदतवाढ देणे हाच आयओएपुढे पर्याय होता.
ही स्पर्धा आयोजित करण्यात आमची कोणतीही अडचण नाही. आम्ही साधनसुविधाही उपलब्ध करू. मात्र, काही अपरिहार्य कारणामुळे आम्हाला स्पर्धेसाठी वेळ वाढवून देण्यात यावी, असे क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनी स्पर्धेचे तांत्रिक समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार यांना सांगितले. मुकेश कुमार यांनी सरकारची बाजू समजून घेत राज्य सरकारला अधिक वेळ देण्यात येईल, हे स्पष्ट केले. मुकेश कुमार यांनी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचीही भेट घेतली. पर्रीकर यांनी स्पर्धेसाठी सरकारकडून पूर्ण सहकार्य केले जाईल. सरकारी पातळीवर कोणताही अडचण येणार नाही, असे आश्वासन दिले. त्यामुळे सध्यातरी गोवा आपले यजमानपद राखून आहे.
मेहता बैठकीविनाच माघारी
भारतीय आॅलिम्पिक संघटनेचे महासचिव राजीव मेहता यांची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यासोबतसकाळी ११ वाजता बैठक होणार होती. मात्र, बैठकीची वेळ वाढविण्यात आली. मेहतांचे परतीचे बुकिंग असल्याने ते थांबले नाहीत. त्यांनी तांत्रिक समितीचे अध्यक्ष मुकेश कुमार यांच्याकडे बैठकीची सूत्रे सोपविली. मुकेश कुमार यांनी मुख्यमंत्री आणि क्रीडामंत्री यांच्यासोबत काही मिनिटे चर्चा केली. या चर्चेचा अहवाल ते आयओएकडे सोपविणार आहेत.
स्पर्धेसाठी आता अधिक वेळ मिळाल्यामुळे चांगली तयारी करता येईल. साधनसुविधाही मार्च-एप्रिलपर्यंत उपलब्ध होतील. आयओएने सरकारला एक सुवर्ण संधी दिली आहे. सरकारने या संधीचा लाभ घेत ही स्पर्धा सर्वाेत्कृष्टपणे आयोजित करण्याचा प्रयत्न करायला हवा.
-गुरुदत्त भक्ता (सचिव, गोवा आॅलिम्पिक संघटना)
Web Title: IOA down in front of government
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.