आयएलटी२० मध्ये अबू धाबी नाईट रायडर्सने शारजाह वॉरियर्सचा ३९ धावांनी पराभव केला. लियान लिव्हिंगस्टोन अबू धाबी नाईट रायडर्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. दरम्यान, ३८ चेंडूत दोन चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट २१५.७९ होता. या खेळीदरम्यान त्याने एकाच षटकात पाच षटकार मारले. ज्यामुळे अबू धाबीच्या संघाला २२३ धावांपर्यंत पोहोचवण्यात मदत केली.
सलामीवीर अॅलेक्सने ३२ धावा आणि अलिशान शराफूने ३४ धावा काढून चांगली सुरुवात केली. यानंतर, लियाम लिव्हिंगस्टोन आणि शेरफेन रदरफोर्ड यांनी शारजाहच्या गोलंदाजांना लक्ष्य केले. या दोघांनी ९५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. लिव्हिंगस्टोनने ३८ चेंडूत २ चौकार आणि ८ षटकारांच्या मदतीने नाबाद ८२ धावांची धमाकेदार खेळी केली. त्याचा स्ट्राईक रेट २१५.७९ होता. शेरफेन रदरफोर्डने त्याला चांगली साथ देत २७ चेंडूत ४५ धावा काढल्या.
अबू धाबीच्या डावातील शेवटच्या षटकात ड्वेन प्रिटोरियसच्या गोलंदाजीवर लिव्हिंगस्टोन पाच षटकार ठोकले. या षटकात लिव्हिंगस्टोनने पहिल्या चेंडूवर षटकार मारला, दुसऱ्या चेंडूवर दोन धावा काढल्या आणि त्यानंतर पुढील चार चेंडूंवर सलग चार षटकार मारले. एकाच षटकात त्याने एक-दोन नव्हे तर तब्बल ३२ धावा काढून गोलंदाजांच्या आत्मविश्वासाला धक्का पोहोचवला.
लक्ष्याचा पाठलाग करताना शारजाह वॉरियर्सचे फलंदाज मोठी भागीदारी करू शकले नाहीत आणि संघ २० षटकांत फक्त १९४ धावांपर्यंतच मजल मारू शकला. टिम डेव्हिडने एक अर्धशतक झळकावत संघासाठी सर्वाधिक ६० धावा काढल्या. ड्वेन प्रिटोरियसने ३९ धावांची खेळी केली. शेवटी, आदिल रशीदने ११ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह २५ धावा काढल्या. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. ऑली स्टोन, जॉर्ज गार्टन आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेऊन संघाचा विजय निश्चित केला. लिव्हिंगस्टोनच्या या विस्फोटक खेळीमुळे नाईट रायडर्सने या हंगामातील आपला पहिला मोठा विजय नोंदवला.