बीकेसीमध्ये रिक्षा चालवली, तिथेच सुरू झाला क्रिकेट प्रवास

मोहम्मद जुनैद खानचा संघर्ष युवांसाठी ठरतोय प्रेरणादायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2024 10:37 IST2024-10-09T10:35:14+5:302024-10-09T10:37:29+5:30

whatsapp join usJoin us+ Follow on Google
inspirational story mohammad juned khan driven a rickshaw to bkc that where the cricket journey started | बीकेसीमध्ये रिक्षा चालवली, तिथेच सुरू झाला क्रिकेट प्रवास

बीकेसीमध्ये रिक्षा चालवली, तिथेच सुरू झाला क्रिकेट प्रवास

रोहित नाईक, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : ज्यांनी ज्यांनी तहान-भूक विसरून आपल्या स्वप्नांचा पाठलाग केला, त्यांना मुंबईने कधीच निराश केले नाही. हाच अनुभव मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद जुनैद खान याने घेतला असून, आज तो यशाचे शिखर गाठण्यासाठी दमदार चढाई करतोय. 

जुनैद सध्या आगामी रणजी मोसमासाठी मुंबई संघासोबत बडोदा येथे आहे. उत्तर प्रदेशमधील कनौज येथील रहिवासी असलेल्या जुनैदने सातव्या इयत्तेत असतानाच आपल्या वडिलांना गमावले. २०१४ साली नोकरीनिमित्ताने मुंबई गाठलेल्या जुनैदने एका जीन्स पँटच्या फॅक्टरीत कामगार म्हणून काम केले. त्यानंतर लॉकडाऊनदरम्यान त्याने ऑटोरिक्षाही चालवली. विशेष म्हणजे, वांद्रे स्थानक ते वांद्रे-कुर्ला संकुलादरम्यान (बीकेसी) त्याने रिक्षाही चालवली. येथेच त्याची पावले क्रिकेट मैदानाकडे वळली. 

संजीवनी क्रिकेट अकादमीमध्ये प्रवेश केल्यानंतर मुंबईचे माजी क्रिकेटपटू मनीष बांगरा यांनी जुनैदची गुणवत्ता हेरली. नुकताच झालेल्या इराणी चषक लढतीत जुनैदने शेष भारताचा कर्णधार ऋतुराज गायकवाडला बाद करत मुंबईला मोठी मदत केली होती.

नायरमुळे मिळाली नवी दिशा

भारताचे सध्याचे सहायक प्रशिक्षक आणि माजी क्रिकेटपटू अभिषेक नायर यांनी अनेक खेळाडूंना घडविले आहे. त्यांनी जुनैदला सर्वप्रथम पोलिस शिल्ड स्पर्धेत पाहिले आणि येथून जुनैदच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने चालना मिळाली. जुनैदने म्हटले की, 'अभिषेक नायर सरांनी माझी खूप मदत केली आहे. मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळेच. मला ते स्वतःहून पैसे द्यायचे. त्यामुळे मला माझ्या घरच्यांना वेळेवर पैसे पाठवता आले. त्यांच्यामुळे मला आयपीएलमध्ये कोलकाता संघाच्या नेट बॉलरची संधी मिळाली.'

विराट' बळीचे स्वप्न

मला समोर येणाऱ्या प्रत्येक फलंदाजाविरुद्ध दमदार मारा करायचा आहे, पण जर एका ड्रीम विकेटबाबत सांगायचे झाले, तर मला एकदा तरी विराट कोहलीला बाद करायचे आहे. मी कोहलीला नेट्समध्ये गोलंदाजी केली आहे, पण त्यावेळी त्याला बाद करता आले नव्हते. माझ्या गोलंदाजीबाबत त्याने चर्चाही केली. त्याच्याशी साधलेला संवाद कधीच विसरता येणार नाही. - मोहम्मद जुनैद खान
 

Web Title: inspirational story mohammad juned khan driven a rickshaw to bkc that where the cricket journey started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई