Join us

इंदूरमध्ये भारतीय संघाचाच डंका

बांगलादेशवर टी२० मालिकेत २-१ ने विजय साजरा करणाऱ्या भारताची नजर गुरुवारपासून सुरू होत असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे लागली आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 04:05 IST

Open in App

इंदूर: बांगलादेशवर टी२० मालिकेत २-१ ने विजय साजरा करणाऱ्या भारताची नजर गुरुवारपासून सुरू होत असलेल्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेकडे लागली आहे. पहिला सामना येथील होळकर स्टेडियमवर खेळला जाणार असून भारतीय संघ आंतरराष्टÑीय क्रिकेटच्या सर्वच प्रकारात येथे अपराजित आहे.मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेच्या २७ हजार प्रेक्षक क्षमतेच्या होकळर मैदानावर २००६ पासून आतापर्यंत एक कसोटी, एक टी२० आणि पाच एकदिवसीय सामन्यांचे आयोजन झाले. सर्व सातही सामन्यात भारताने प्रतिस्पर्धी संघांना पराभूत केले आहे. भारत- बांगलादेश यांच्यात १४ ते १८ नोव्हेंबर या कालावधीत खेळला जाणारा सामना होळकर मैदानावरील दुसरा कसोटी सामना असेल. पहिली कसोटी भारत-न्यूझीलंड यांच्यात २०१६ ला खेळली होती. त्यात भारताने तब्बल ३२१ धावांनी दणदणीत विजय नोंदवला होता.बांगलादेश संघ मात्र या मैदानावर पहिल्यांदाच आपला दम दाखविण्याचा प्रयत्न करेल. सामन्याआधी पाहुण्या संघाचा यष्टिरक्षक- फलंदाज मोहम्मद मिथुन याने सांगितले की, ‘आम्ही यजमान भारतीय संघाचा आदर करतो. जगातील अव्वल संघांपैकी हा एक संघ आहे. घरच्या मैदानावर भारताला पराभूत करणे कठीणच आहे. तथापि आगामी कसोटी मलिकेमध्ये आम्ही त्यांच्याविरुद्ध दमदार कामगिरीच्या निर्धारासह उतरणार आहोत.’ (वृत्तसंस्था)>तंदुरुस्ती चाचणीसाठी भुवनेश्वरचा संघासोबत सरावइंदूर : अखडलेला खांदा आणि स्नायूच्या दुखापतीमुळे त्रस्त असलेला वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी आपल्या तंदुरुस्तीची चाचणी घेण्यासाठी भारतीय संघासोबत सरावात सहभागी झाला होता. भुवनेश्वर रिहॅबिलिटेशनच्या अखेरच्या सत्रात आहे. भारतीय संघ व्यवस्थापनाचे त्याच्यावर लक्ष आहे. विंडीजहून परतल्यानंतर भुवनेश्वरची दुखापत भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे. तो राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये रिहॅबिलिटेश्न कार्यक्रमात सहभागी झाला आहे. संघातील सूत्राने सांगितले,‘भुवी येथे संघासोबत स्किल सेशनमध्ये सहभागी होत आहे. तो फॉर्मात असावा, असे संघव्यवस्थापनाला वाटते.’ त्याने क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांच्यासह कॅचिंग सत्रात सहभाग नोंदवला. त्याने काही चेंडू पूर्ण रनअपसह टाकले. खलील अहमद आता शिकत असून जसप्रीत बुमराहच्या कार्यभारवरही लक्ष द्यायचे आहे. त्यामुळे भुवनेश्वर फिट होऊन संघात परतणे भारतासाठी महत्त्वाचे आहे. भुवनेश्वरच्या उपस्थितीमुळे फिजियो नितीन पटेलव ट्रेनर निक वेब भविष्यात त्याच्या फिटनेसवर महत्त्वाची भूमिका बजावतील, असे संकेत मिळत आहेत. अलीकडच्या वर्षांमध्ये राष्ट्रीय क्रिकेट अकादमीवर मोठी टीका झाली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमी सेंटर आॅफ एक्सलन्स ऐवजी ते रिहॅबिलिटेशन सेंटर झाल्याचे म्हटले जाते.>बांगलादेशला गृहित धरण्याची चूक करणार नाही टीम इंडियाइंदूरच्या होळकर मैदानावर आतापर्यंत अपराजित असलेला भारतीय संघ टी२० मालिका जिंकल्यानंतरही बांगलादेशला कमकुवत मानण्याची चूक करणार नाही. घरच्या मैदानावर बांगलादेशचे आव्हान किती मोठे आहे, यावर संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे म्हणाला, ‘बांगलादेश संघाचे खेळाडू झुंजार आहेत. ते सहजासहजी हार पत्करत नाही. प्रतिस्पर्धी संघाविरुद्ध ते सांघिक भावनेने खेळतात. तथापि आम्ही प्रतिस्पर्धी संघाचा विचार करणार नाही. आम्ही या मालिकेत आमच्या बलस्थानावर लक्ष केंद्रित करणार असून सर्वोत्तम कामगिरी करण्यावर आमचा भर कायम असेल.’