Join us

भारताची युवा गुणवत्ता समोर आली

आयपीएल आता अत्यंत रोमांचक स्थितीत आली असून, एका आठवड्यात प्ले आॅफमध्ये पोहोचणारे चार संघ ठरतील. सध्या एका संघाने म्हणजेच सनरायझर्स हैदराबादने प्ले आॅफमधील आपले स्थान निश्चित केलेच आहे,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 01:36 IST

Open in App

अयाझ मेमन, संपादकीय सल्लागारआयपीएल आता अत्यंत रोमांचक स्थितीत आली असून, एका आठवड्यात प्ले आॅफमध्ये पोहोचणारे चार संघ ठरतील. सध्या एका संघाने म्हणजेच सनरायझर्स हैदराबादने प्ले आॅफमधील आपले स्थान निश्चित केलेच आहे, मात्र उर्वरित तीन संघही लवकरच कळतील. सध्या चेन्नई सुपरकिंग्ज, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि कोलकाता नाइट रायडर्स या तीन संघांना प्ले आॅफची सर्वाधिक संधी आहे. मात्र, ज्या प्रकारे रॉयल चँलेंजर्स बँगलोर, मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी दाखवलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे वरील तीन संघांपैकी कोणाचेही स्थान धोक्यात येऊ शकते. त्यामुळे अजूनही प्ले आॅफमधील उर्वरित तीन संघांविषयीचे गुपित कायम राहिले आहे. यंदाच्या सत्रात हैदराबाद अव्वल संघ दिसला आहे. फलंदाजी व गोलंदाजीत त्यांनी कमालीची कामगिरी केली आहे. तरी अव्वल स्थान कायम राखण्यासाठी त्यांचीही धडपड सुरूआहे. कारण, अव्वल दोन स्थानांवर राहणाऱ्या संघांसाठी अंतिम फेरी गाठण्यास दोन संधी मिळतात.त्याचबरोबर यंदाच्या सत्रातून भारतीय क्रिकेटमधील अफाट युवा गुणवत्ता समोर आली आहे. यामध्ये अनेकांना आश्चर्य वाटत असेल, पण मला यात काहीच विशेष वाटत नाही. कारण आयपीएलद्वारे युवांसाठी एक मोठी संधी निर्माण झाली आहे. आयपीएलद्वारे भारतीय संघात प्रवेश करण्याचा युवांचा प्रयत्न असतो. यामध्ये मी काही निवडक खेळाडूंचाच उल्लेख करेन, मात्र त्याहून अधिक खेळाडूंनी आपली छाप पाडली आहे, हे विसरू नका. २० वर्षीय ऋषभ पंत, यंदा त्याने धुवाधार फलंदाजी केली आहे. त्याने याआधीच भारतीय संघात प्रवेश केला आहे, मात्र आता वेळ आली आहे ते स्थान भक्कम करण्याची. दुसरा खेळाडू इशान किशन. हा ऋषभच्या फार मागे नाही. त्याच्याकडे ऋषभच्या तुलनेत ताकद जास्त नाही, मात्र टायमिंग जबरदस्त आहे. विशेष म्हणजे दोघेही यष्टीरक्षक फलंदाज असल्याने दोघांमध्येही भारतीय संघात स्थान मिळवण्यास एक मोठी शर्यत लागेल. याशिवाय संजू सॅमसनकडून त्यांना थोडीफार स्पर्धा मिळू शकते. तसेच शुभमान गिल, पृथ्वी शॉ, शिवम मावी आणि शनिवारी सर्वांचे लक्ष वेधलेला अभिषेक शर्मा यांनीही आपली छाप पाडली आहे. हे सर्व खेळाडू १९ वर्षांखालील संघातून आले आहेत, आणि भविष्यात यापैकी काही जण नक्कीच स्टार खेळाडू बनतील.मी अनेक असे खेळाडू बघितले, ज्यांच्या जोड्या खूप प्रसिद्ध झाल्या. जसे की, ग्रेनिज-हेल्स, लक्ष्मण-द्रविड, हेडन-लँगर, सोबर्स-कॅन्हाय अशा अनेक जोड्या क्रिकेटइतिहासात प्रसिद्ध आहेत. तसेच अनेक भागीदाºया लक्षवेधी आणि रोमहर्षक होतात. इंग्लंडचे काऊंड्री-मे, पाकिस्तानचे झहीर अब्बास-जावेद मियाँदाद, काही प्रमाणात गावसकर-विश्वनाथ, सचिन-गांगुली आणि त्यानंतर सचिन-सेहवाग, या अशा अनेक जोड्यांनी आपला काळ गाजवला आहे. पण जी जादू विराट कोहली-एबी डिव्हिलियर्स या जोडीने केली आहे, ती भन्नाट आहे. जेव्हा हे दोघे एकत्र खेळतात, तेव्हा शानदार फलंदाजी पाहायला मिळते. विशेष म्हणजे या दोघांमध्ये उत्कृष्ट ताळमेळ दिसून येतो. दोघेही महान खेळाडू आहेत. ज्या प्रकारे दोघेही धावून धावा घेतात, तेव्हा ते प्रतिस्पर्धी संघाची लय बिघडवून टाकतात. यामुळेच अनेक सामने कोहली-डिव्हिलियर्स यांनी संघाला जिंकवून दिले आहेत. त्यामुळेच माझ्या मते, हे दोघेही ‘जोडी नंबर वन’ आहेत.

टॅग्स :आयपीएल 2018