Join us  

भारताचे युवा खेळाडू स्वत:ला सिद्ध करण्यास सज्ज, भारत - श्रीलंका सलामी लढत आज रंगणार

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:24 AM

Open in App

कोलंबो  - रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारताचा युवा संघ मंगळवारी तिरंगी निधास टी-२० कप स्पर्धेच्या सलामी लढतीत श्रीलंकेच्या आव्हानाला सामोरे जाणार आहे. पुढील वर्षी होणा-या विश्वकप स्पर्धेत निवड समितीचे लक्ष वेधण्याची युवा खेळाडूंना संधी आहे.यंदाच्या मोसमात भारताने श्रीलंकेविरुद्ध मायदेशात व श्रीलंकेत १८ आंतरराष्ट्रीय (६ कसोटी, ८ वन-डे आणि ४ टी-२०) सामने खेळले आहेत.बांगलादेश या मालिकेत सहभागी झालेला तिसरा संघ आहे. भारताने या मालिकेसाठी आघाडीच्या सहा खेळाडूंना विश्रांती दिली आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना स्वत:ला सिद्ध करण्याची संधी आहे. रिषभ पंत, दीपक हुड्डा व मोहम्मद सिराज यांचा संघात समावेश आहे. आयसीसी विश्वकप स्पर्धेला केवळ १६ महिन्यांचा कालावधी शिल्लक असून प्रत्येक खेळाडू निवड समितीचे लक्ष वेधण्यास प्रयत्नशील आहे.भारतीय संघाने जास्तीतजास्त वेळा श्रीलंका संघाला पराभूत केले आहे. कार्यवाहक कर्णधार रोहित शर्माकडे जेतेपद पटकावण्याची चांगली संधी आहे. दक्षिण आफ्रिका दौºयात निराशाजनक कामगिरीनंतर रोहित शर्माला सूर गवसण्याची आशा आहे. त्याला दक्षिण आफ्रिका दौºयात एकदिवसीय लढतीमध्ये केवळ एक शतक ठोकता आले.प्रेमदासा स्टेडियममध्ये रोहित आपला सहकारी शिखर धवनच्या साथीने चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे. सुरेश रैना संघातील स्थान पक्के करण्यास प्रयत्नशील आहे. सुरंगा लकमल, दुष्मंत चामीरा व दासुन शनाका या वेगवान गोलंदाजांविरुद्ध त्याला अधिक अडचण भासणार नाही, अशी आशा आहे.प्रतिभावान लोकेश राहुलला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली नाही तर रैनाच्या उपस्थितीत त्याला चौथ्या क्रमांकावर खेळावे लागेल. मनीष पांडे अनेक दिवसांपासून आपली दावेदारी सादर करीत आहे. त्याने मिळालेल्या संधींचा चांगला वापर केला आहे. दिनेश कार्तिक पाचव्या स्थानावर फलंदाजी व यष्टिरक्षण अशी दुहेरी भूमिका बजावेल, अशी आशा आहे. सहाव्या स्थानासाठी दीपक हुड्डा व रिषभ पंत यांच्यादरम्यान चुरस राहण्याची शक्यता आहे. प्रेमदासावर विद्युतझोतात खेळपट्टी हळू-हळू संथ होते, असा अनुभव आहे. त्यामुळे वाशिंग्टन सुंदर व यजुवेंद्र चहल हे दोन फिरकीपटू चांगला पर्याय ठरू शकतात.शार्दुल ठाकूरने दक्षिण आफ्रिकेत छाप सोडली होती. तो जयदेव उनाडकटच्या साथीने नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची शक्यता आहे. भारतीय संघ एक अतिरिक्त वेगवान गोलंदाज खेळवतो की अष्टपैलूसह खेळण्याचा निर्णय घेतो, याबाबत उत्सुकता आहे. अतिरिक्त वेगवान गोलंदाजाची निवड केली तर मोहम्मद सिराजला संधी मिळू शकते अन्यथा तामिळनाडूचा अष्टपैलू विजय शंकरला स्थान मिळेल. (वृत्तसंस्था)भारत यापूर्वी श्रीलंकेत खेळला होता त्यावेळी यजमान संघाला सर्वंच प्रकारच्या क्रिकेटमध्ये ९-० ने व्हाईटवॉश दिला होता, पण यावेळी मात्र ते सोपे नाही. श्रीलंकेने अलीकडेच बांगलादेशमध्ये तिरंगी एकदिवसीय सामन्यांची स्पर्धा जिंकलेली आहे. त्यामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. दिनेश चांदीमल, उपुल थरंगा, कुसाल मेंडिस, कुसाल परेरा हे सर्व प्रतिभावान खेळाडू आहेत, पण गेल्या काही दिवसांपासून ते ‘आऊट आॅफ फॉर्म’ आहेत.प्रतिस्पर्धी संघभारत :- रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन (उपकर्णधार), के.एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक (यष्टिरक्षक), दीपक हुड्डा, वाशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज आणि रिषभ पंत (यष्टिरक्षक).श्रीलंका :- दिनेश चांदीमल (कर्णधार), सुरंगा लकमल (उपकर्णधार), उपुल थरंगा, धनुष्का गुणतिलक, कुसाल मेंडिस, दासुन शनाका, कुसाल परेरा, तिसारा परेरा, जीवन मेंडिस, इसुरू उदाना, अकिला धनंजय, अमिला अपोन्सो, नुआन प्रदीप, दुष्मंत चामिरा, धनंजय डी सिल्वा.बांगलादेश :- महमुदुल्लाह (कर्णधार), लिटन दास, तमिम इकबाल, सौम्य सरकार मुश्फिकर रहीम, सब्बीर रहमान, मुस्तफिजुर रहमान, रूबेल हुसेन, अबु जावेद, तास्किन अहमद, इमरूल कायेस, नुरूल हसन, मेहदी हसन, अरिफुल हक, नजमुल इस्लाम, अबु हिदर रॉनी.

टॅग्स :क्रिकेटभारतीय क्रिकेट संघश्रीलंका