मुंबई : अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह हा अजूनही ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिमेचा धनी आहे. त्याच्या अनुपस्थितीत भारतीय संघाने इंग्लंड दौऱ्यात दोन कसोटी सामने जिंकणे हा केवळ योगायोग असल्याचा दावा दिग्गज माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी बुधवारी केला. बुमराह इंग्लंडमध्ये पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत केवळ तीन सामने खेळला. भारतीय संघाने या दौऱ्यात जे दोन सामने जिंकले, त्या दोन्ही सामन्यांत कार्यभार व्यवस्थापनामुळे बुमराह खेळला नव्हता.
यावर मत मांडताना सचिन म्हणाले की, ‘बुमराहच्या अनुपस्थितीत बर्मिंगहॅम आणि द ओव्हल येथील भारताचे विजय ‘निव्वळ योगायोग’ म्हणावे लागतील.’ सचिन यांनी बुमराहच्या तीन कसोटीतील कामगिरीवर भाष्य केले. बुमराहने मालिकेत एकूण १४ गडी बाद केले. ‘रेडिट’वरील आपल्या व्हिडिओ विश्लेषणात सचिन यांनी म्हटले की, ‘बुमराहने खरोखर जबरदस्त सुरुवात केली. पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात पाच बळी घेतले. तो दुसऱ्या कसोटीत खेळला नाही, पण तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीत खेळला. त्या दोन कसोटीतल्या एका सामन्यात त्याने पुन्हा पाच बळी घेतले.’
सचिन यांनी पुढे म्हटले की, ‘लोक चर्चा करत आहेत की, भारताने जे दोन सामने जिंकले त्यात जसप्रीत बुमराहचे योगदान नव्हते. माझ्या मते हा केवळ योगायोग आहे. बुमराहची गोलंदाजी असामान्य आहे. त्याने आतापर्यंत जो काही टप्पा गाठला तो अविश्वसनीय आहे. बुमराह सातत्यपूर्ण कामगिरी करतो, यात कोणती शंकाच नाही. मी त्याला इतर कोणत्याही गोलंदाजापेक्षा श्रेष्ठ मानतो.’
मोहम्मद सिराजची प्रभावी कामगिरी
बुमराहच्या अनुपस्थितीत मोहम्मद सिराजने सर्व पाचही सामने खेळून उत्कृष्ट कामगिरी केली. सिराजने १८५.३ षटके टाकून २३ गडी बाद केले. पण, आकडेवारीनुसार बुमराह सिराजपेक्षा खूप पुढे आहे. बुमराहने ४८ कसोटी सामन्यांत २१९ गडी बाद केले आहेत, तर सिराजच्या नावावर ४१ कसोटीत १२३ बळी आहेत.
भारतीय संघाने या दौऱ्याच्या सुरूवातीलाच जाहीर केलेल्या योजनेनुसार जसप्रीत बुमराहला पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत खेळविण्यात आले नाही. यामुळे कार्यभार व्यवस्थापनेवर टीकाही झाली. दुसरीकडे, संघ व्यवस्थापनाने स्पष्ट केले की, ‘बुमराहसंदर्भात कोणताही धोका पत्करता येणार नाही.’
इंग्लिश गोलंदाजांच्या विश्रांतीची जबाबदारी भारताने का घ्यावी?
चौथ्या कसोटीत मँचेस्टरमध्ये घडलेला ‘हँडशेक’चा वाद इंग्लिश खेळाडूंच्या ‘रडीच्या डावा’चे प्रतीक ठरला. रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर यांनी इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने सामना बरोबरीत सोडविण्यासाठी दिलेला हस्तांदोलनाचा प्रस्ताव नाकारला आणि फलंदाजी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. काहींनी हा प्रकार खेळातील नैतिकतेविरुद्ध असल्याचे म्हटले, तर काहींनी तो धोरणात्मक चाणाक्षपणा होता, या शब्दांत गौरव केला. सचिन यांनी भारतीय संघाच्या या निर्णयाला ठामपणे पाठिंबा दिला आहे. सचिन म्हणाले की, ‘भारतीय खेळाडूंनी हात का मिळवायला हवा होता? इंग्लंडच्या गोलंदाजांना विश्रांती कशाला हवी होती? बेन स्टोक्सने हॅरी ब्रूकला गोलंदाजी द्यायचे ठरवले असेल, तर तो त्याचा निर्णय होता. ती भारतीय संघाची जबाबदारी नव्हती.’
...तर पराभव झाला असता!
सचिन पुढे म्हणाले की, ‘वॉशिंग्टन आणि जडेजाने शतक झळकावले, यात काय गैर काहीही नव्हते? त्यांनी आपापली शतके पूर्ण करण्यासाठी नव्हे, तर सामना अनिर्णीत ठेवण्यासाठी निकराची झुंज दिली. दोघे झटपट बाद झाले असते, तर भारताने सामना गमावला असता.’
या निर्णयामागील रणनीतीचेही सचिनने समर्थन केले. ते म्हणाले की, ‘मालिका जिवंत होती. मग, इंग्लंडच्या गोलंदाजांना पाचव्या कसोटीपूर्वी ताजेतवाने ठेवण्याची गरज भारताने का समजून घ्यावी? याचे उत्तर आहे का तुमच्याकडे? नाही ना!’
वॉशिंग्टन खरा अष्टपैलू
सचिन यांनी वॉशिंग्टन सुंदरच्या अष्टपैलू भूमिकेचेही समर्थन केले, ‘ज्यावेळी खेळपट्टीवर स्थिरावण्याची गरज होती, त्यावेळी त्याने जबाबदारीने खेळ केला. जेव्हा आक्रमक फटकेबाजीची गरज होती, तेव्हा धावादेखील काढल्या.
पाचव्या कसोटीतील त्याचे योगदानही नजरेआड करता येणार नाही. मी पूर्णपणे भारतीय संघासोबत आहे. मी १०० टक्के टीम इंडियाच्या निर्णयाच्या बाजूने आहे,’ असे सचिन यांनी म्हटले.
Web Title: India's victory in Bumrah's absence was a coincidence This bowler is a man of 'extraordinary and incredible' talent says Sachin Tendulkar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.