Join us  

भारताविरुद्धचा विजय महत्त्वाचा - बोल्ट

फलंदाजांवर वर्चस्व गाजवणा-या ट्रेंट बोल्टने जेतेपदाचा प्रबळ दावेदार संघाविरुद्धच्या विजयामुळे न्यूझीलंड संघाचे विश्वचषक स्पर्धेपूर्वी मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली असल्याचे म्हटले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 3:47 AM

Open in App

लंडन : भारताविरुद्धच्या सराव सामन्यात स्विंग माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांवर वर्चस्व गाजवणा-या ट्रेंट बोल्टने जेतेपदाचा प्रबळ दावेदार संघाविरुद्धच्या विजयामुळे न्यूझीलंड संघाचे विश्वचषक स्पर्धेपूर्वी मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली असल्याचे म्हटले आहे. बोल्टने ३३ धावांत ४ बळी घेतले. न्यूझीलंडने भारताचा डाव ४० षटकांपूर्वीच १७९ धावांत गुंडाळला.शनिवारी झालेल्या लढतीनंतर बोल्ट म्हणाला,‘चेंडू स्विंग होताना बघणे आनंददायी होते. मला प्रत्येक लढतीत अशी खेळपट्टी मिळाली तर नक्कीच आवडेल. विश्वचषक स्पर्धा आव्हानात्मक असते, पण गोलंदाजी विभागाचा विचार करता आम्ही त्यासाठी सज्ज आहोत. या लढतीमुळे आमचे मनोधैर्य उंचावण्यास मदत झाली. चेंडू स्विंग झाला नाही तर सर्वांत मोठे आव्हान राहील. त्यावेळी कसे बळी घ्यायचे यावर लक्ष केंद्रित करावे लागेल.’विश्वचषक स्पर्धेत मोठ्या धावसंख्येच्या लढती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बोल्ट म्हणाला, ‘फलंदाजी करणाºया संघासाठी सुरुवातीच्या विकेट किती महत्त्वाच्या आहेत, याची आम्हाला कल्पना आहे. सुरुवातीला बळी घेण्यासाठी अधिक आक्रमक होण्याची गरज आहे. आघाडीच्या फळीतील दोन-तीन फलंदाजांना बाद केल्यानंतर प्रतिस्पर्धी संघ दडपणाखाली येतो, याची आम्हाला माहिती आहे. ही आमची मूळ रणनीती आहे. चेंडू पुढे टाकत अधिक स्विंग करण्याची माझी रणनीती राहील.’