नवी दिल्ली : सातत्यपूर्ण प्रदर्शन आणि योग्यता यामुळे टीम इंडिया २०१९ मध्ये आयसीसी विश्वचषक जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार आहे, असे मत भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुली याने व्यक्त केले आहे. आपल्या आत्मकथेच्या अनावरणप्रसंगी गांगुली बोलत होता.
तो म्हणाला, ‘भारत २००३ आणि २००७ मध्येही विश्वचषकाच्या प्रबळ दावेदाराच्या रूपात गेला होता. त्यानंतर २०११ मध्येही तिच स्थिती होती आणि तिथे भारतीय संघ यशस्वी ठरला. विश्वचषकातील सर्वाेत्कृष्ट संघ कोणता? यावर माझा विश्वास नाही; कारण प्रत्येक संघ हा वेगळ्या परिस्थितीनुसार खेळत असतो. आपल्याजवळ अशी टीम आहे जी मजबूत आहे. त्यामुळे मला भारतीय संघाबाबत विश्वास वाटतो.’ २००३ मध्ये गांगुलीच्या नेतृत्वाखाली भारत अंतिम फेरीत पोहचला होता. मात्र, चषक जिंकू शकला नाही. यानंतर २००७ मध्ये टीमने खूप खराब प्रदर्शन केले होते. त्यावेळी भारताला साखळी फेरीतूनच आपला गाशा गुंडाळावा लागला होता.
३० मे ते १४ जुलै कालावधीत विश्वचषक
२०१९ ची विश्वचषक स्पर्धा ३० मे ते १४ जुलै दरम्यान इंग्लंडमध्ये होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना ३० मे रोजी इंग्लंड-दक्षिण आफ्रिका यांच्यात ओव्हल येथे होईल. भारताची मोहीम ५ जूनपासून सुरू होणार असून पहिला सामना द. आफ्रिकेविरुद्ध हॅम्पशायर येथे होईल.
गांगुलीच्या पुस्तकाबाबत..
गांगुली आपल्या पुस्तकाबाबत म्हणाला की, ‘माझ्याविषयी असे काहीच नाही जे भारतीय क्रिकेटप्रेमींना माहीत नाही. म्हणून मी विचार केला की, मी असे लिहायला हवे जे युवा क्रिकेटपटूंच्या नेहमी स्मरणात राहील. प्रेरणादायी ठरेल. तेच या पुस्तकात आहे. ‘ए सेन्चुरी इज इनफ’ असे पुस्तकाचे नाव असून याचा अर्थ केवळ धावा करून चॅम्पियन बनतो असे नाही. विशिष्ट पातळीवर गेल्यानंतर आयुष्यात बरेच चढ-उतार पाहावे लागतात. त्यास सामोरे जावे लागते.’