Join us  

भारताची शानदार विजयी सलामी, कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवले

गतविजेत्या भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना दृष्टीहीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी देताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७ बळींनी लोळवले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2018 8:43 PM

Open in App

दुबई : गतविजेत्या भारतीय संघाने आपल्या लौकिकानुसार कामगिरी करताना दृष्टीहीन विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत शानदार विजयी सलामी देताना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला ७ बळींनी लोळवले. गतस्पर्धेत भारताने पाकिस्तानलाच पराभवाची धूळ चारत विश्वविजेतेपद उंचावले होते. अष्टपैलू कामगिरी केलेल्या दीपक मलिका याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले. 

यूएई येथील अजमन ओव्हल मैदानावर झालेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने पाकिस्तानला प्रथम फलंदाजीची संधी दिली. पाकिस्तानने ४० षटकांमध्ये ८ फलंदाजांच्या मोबदल्यात २८२ धावांची समाधानकारक मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीयांनी जबरदस्त फटकेबाजी करताना ३४.५ षटकांमध्ये केवळ ३ फलंदाज गमावून २८५ धावा काढल्या. डी. व्यंकटेश्वरा राव याने ५५ चेंडूत ६ चौकारांसह ६४ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तसेच, दीपक मलिकने अखेरपर्यंत नाबाद राहताना ७१ चेंडूत ८ चौकारांसह ७९ धावांचा तडाखा देत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. अजयकुमार रेड्डी यानेही ३४ चेंडूत ५ चौकारांसह नाबाद ४७ धावांची खेळी केली. पाकिस्तानकडून झफर इक्बाल याने २, तर हरुन याने एक बळी घेतला.

तत्पूर्वी, भारतीयांनी नियंत्रित मारा करताना पाकिस्तानला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. अजय रेड्डी, दीपक मलिक, सुनिल रमेश, रमबिर आणि बसप्पा वदगोल यांनी प्रत्येकी एक बळी घेतले. आघाडीचे फलंदाज झटपट बाद झाल्यानंतर निसार अली याने ६५ चेंडूत ६३ धावांची खेळी केली. तसेच, तळाच्या फळीतील मुहम्मद जमिल याने ९५ चेंडूत ९४ धावांची निर्णायक खेळी करत पाकिस्तानला समानाधनकारक मजल मारुन दिली.संक्षिप्त धावफलक :पाकिस्तान : ४० षटकात ८ बाद २८२ धावा (मुहम्मद जमिल ९४, निसार अली ६३; अजय रेड्डी १/२८, दीपक मलिक १/५१, सुनिल रमेश १/४०, रमबिर १/४४, बसप्पा वदगोल १/४४) पराभूत वि. भारत : ३४.५ षटकात २८५ धावा (दीपक मलिक नाबाद ७९, डी. व्यंकटेश्वरा राव ६४, अजय कुमार रेड्डी नाबाद ४७; झफर इक्बाल २/२७, हरुन १/४६)

टॅग्स :क्रिकेटपाकिस्तान