Join us  

भारताचा विक्रमी विजय, श्रीलंकेवर एक डाव २३९ धावांनी मात

फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक मा-याच्या जोरावर भारताने सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुस-या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव २३९ धावांनी पराभव आणि ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 2:33 AM

Open in App

नागपूर : फलंदाजांच्या चमकदार कामगिरीनंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुस-या कसोटीत श्रीलंकेचा एक डाव २३९ धावांनी पराभव आणि ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.व्हीसीएच्या जामठा स्टेडियममध्ये अपेक्षेप्रमाणे आज चौथ्या दिवशी संपलेल्या लढतीत रविचंद्रन आश्विनने ६३ धावांत चार तर ईशांत शर्मा, रवींद्र जडेजाने व उमेश यादव यांनी प्रत्येकी दोन बळी घेत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. द्विशतकी खेळी करणारा कर्णधार विराट कोहली सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आश्विनने गमागेला बाद करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले आणि कसोटी क्रिकेटमध्ये सर्वांत जलद ३०० बळींचा पल्ला गाठण्याचा पराक्रम केला. त्याने ५४ कसोटीत हा पराक्रम करताना लिलीचा (५६ कसोटी) विक्रम मोडला. आश्विनने या कसोटीत एकूण १३० धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेतले.श्रीलंकेचा पहिला डाव २०५ धावांत गुंडाळणाºया भारताने प्रत्युत्तरात खेळताना विराट कोहली, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा व रोहित शर्मा यांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर दमदार मजल मारत पहिला डाव ६ बाद ६१० धावसंख्येवर घोषित केला. पहिल्या डावात ४०५ धावांची भक्कम आघाडी घेणाºया भारताने श्रीलंकेचा दुसरा डाव चौथ्या दिवशी उपाहारानंतर ४९.३ षटकांत १६६ धावांत गुंडाळला. श्रीलंकेतर्फे कर्णधार दिनेश चांदीमलचा (६१) अपवाद वगळता अन्य फलंदाजांची कामगिरी निराशाजनक ठरली. आश्विनने गमागेला क्लीनबोल्ड करीत कसोटी कारकिर्दीत बळींचे त्रिशतक पूर्ण करताना भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.कालच्या १ बाद २१ धावसंख्येवरून पुढे खेळताना श्रीलंकेने पहिल्या सत्रात ७ फलंदाज गमावले. श्रीलंकेची ८ बाद १०७ अशी अवस्था असताना पंचांनी उपाहारापूर्वी अर्धा तासाचा खेळ लांबविला, पण चांदीमल व लकमल यांनी संघर्षपूर्ण खेळ करीत भारताला विजयासाठी प्रतीक्षा करण्यास भाग पाडले. उपाहारानंतर उमेशने चांदीमलला तंबूचा मार्ग दाखवीत भारताचा मार्ग प्रशस्त केला. त्यानंतर आश्विनने गमागेला बाद करीत श्रीलंकेचा दुसरा डाव गुंडाळला.- भारताने मोठ्या फरकाने विजय साकारताना यापूर्वी बांगलादेशविरुद्ध सर्वांत मोठ्या फरकाने मिळवलेल्या विजयाची बरोबरी केली. मीरपूरमध्ये २००७ मध्ये भारताने द्रविडच्या नेतृत्वाखाली बांगलादेशचा एक डाव २३९ धावांनी पराभव केला होता.- भारताने गाले येथे २६ जुलै २०१७ रोजी श्रीलंकेचा ३०४ धावांनी पराभव केला होता.- कोलंबो येथे २० आॅगस्ट २०१५ रोजी भारताने २७८ धावांनी श्रीलंकेला नमविले होते.- अहमदाबाद येथे १८ डिसेंबर २००५ रोजी भारताने श्रीलंकेचा २५९ धावांनी पराभव केला होता.आश्विनने मोडला लिलीचा विक्रम- भारतीय आॅफस्पिनर रविचंद्रन आश्विनने सोमवारी श्रीलंकेविरुद्ध दुसºया कसोटी सामन्यात मिळवलेल्या विजयात सर्वांत वेगवान ३०० बळी घेण्याचा डेनिस लिलीचा विक्रम मोडला.- आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज लिलीने १९८१ मध्ये ५६ कसोटी सामन्यांत हा विक्रम नोंदवला होता. ३६ वर्षांनंतर आश्विनने या विक्रमाला गवसणी घातली. आश्विनने विक्रमी कामगिरी करताना अनेक दिग्गजांना पिछाडीवर सोडले. श्रीलंकेचा मुथय्या मुरलीधरन (५८ कसोटी), रिचर्ड हॅडली, माल्कम मार्शल व डेल स्टेन (६१ कसोटी) यांचा यातसमावेश आहे.- कसोटी क्रिकेटमध्ये ३०० किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेणारा आश्विन भारताचा पाचवा गोलंदाज आहे. त्याच्यापेक्षा अधिक बळी घेणाºया गोलंदाजांमध्ये अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) आणि झहीर खान (३११) यांचा समावेश आहे.बिशनसिंग बेदी (२६६), भागवत चंद्रशेखर (२४२) आणि इरापल्ली प्रसन्ना (१८९) हे जगप्रसिद्ध त्रिकूट आश्विनच्या तुलनेत पिछाडीवर आहे.- आश्विन म्हणाला, ‘६०० बळी घेण्यात यश येईल, अशी आशा आहे. आता मी केवळ ५४ कसोटी सामनेच खेळलेले आहेत. फिरकी गोलंदाजी सोपी नाही. आम्ही बरीच षटके टाकली आणि विश्रांतीचाही मला लाभ झाला. आता मला फ्रेश वाटते.’आश्विन पुढे म्हणाला, ‘कॅरम बॉल चांगला चेंडू असून गेल्या दोन वर्षांत मी याचा अधिक वापर केला नाही. मी त्यावर बरीच मेहनत घेतली आहे. मी प्रदीर्घ ब्रेक घेतला; पण वोर्सेस्टरमध्ये माझी कामगिरी चांगली झाली. मला अनेक नव्या बाबी शिकता आल्या.’आश्विनचा ३०० वा बळी लाहिरू गमागे ठरला. त्याला त्याने ‘दुसरा’ चेंडूवर बाद केले. आश्विनने २५.१५ च्या सरासरीने बळी घेतले आहेत.धावफलकश्रीलंका पहिला डाव २०५.भारत पहिला डाव ६ बाद ६१० (डाव घोषित).श्रीलंका दुसरा डाव : सदिरा समरविक्रमा त्रि. गो. ईशांत ००, दिमुथ करुणारत्ने झे. विजय गो. जडेजा १८, लाहिरू थिरिमाने झे. जडेजा गो. उमेश २३, अ‍ॅन्जेलो मॅथ्यूज झे. रोहित गो. जडेजा १०, दिनेश चांदीमल झे. आश्विन गो. उमेश ६१, निरोशन डिकवेला झे. कोहली गो. ईशांत ०४, दासुन शनाका झे. राहुल गो. आश्विन १७, दिलरुवान परेरा पायचित गो. आश्विन ००, रंगना हेराथ झे. रहाणे गो. आश्विन ००, सुरंगा लकमल नाबाद ३१. एल. गमागे त्रि. गो. आश्विन ००. अवांतर (२). एकूण ४९.३ षटकांत सर्व बाद १६६. बाद क्रम : १-०, २-३४, ३-४८, ४-६८, ५-७५, ६-१०२, ७-१०७, ८-१०७, ९-१६५, १०-१६६. गोलंदाजी : ईशांत शर्मा १२-४-४३-२, रविचंद्रन आश्विन १७.३-४-६३-४, रवींद्र जडेजा ११-५-२८-२, उमेश यादव ९-२-३०-२.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघक्रिकेट