Join us  

शोएब अख्तर म्हणतो... 'भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो'!

माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल मोठं विधान केलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 10:48 AM

Open in App

भारत आणि पाकिस्तान या शेजारील राष्ट्रांमधील संबंध कसे आहेत, हे जगजाहीर आहे. दहशतवादी कृत्यांना पाकिस्तानातून खतपाणी मिळते, त्यामुळेच भारताने त्यांच्याशी सर्व संबंध तोडले आहेत. उभय देशांमध्ये द्विदेशीय क्रिकेट मालिकाही बंदच आहेत. केवळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) स्पर्धेत उभय संघ एकमेकांना भिडतात. नुकतेच हे संघ २०१९मध्ये झालेल्या वन डे वर्ल्ड कपमध्ये, २०२० मध्ये झालेल्या  १९ वर्षांखालील मुलांच्या उपांत्य फेरीत एकमेकांविरुद्ध खेळले होते. भारत आणि पाकिस्तान यांच्यात द्विदेशीय मालिका व्हावी, अशी इच्छा पाकिस्तानी खेळाडूंनी अनेकदा बोलून दाखवली आहे. माजी गोलंदाज शोएब अख्तरनेही दोन्ही देशांमधील संबंधांबद्दल मोठं विधान केलं.

पाकिस्तानमधील एका चॅनलच्या चर्चा सत्रात बोलताना अख्तर म्हणाला,''भारत खुप सुंदर ठिकाण आहेत आणि येथील माणसंही मस्त आहेत. येथील लोकांना पाकिस्तानसोबत युद्ध हवंय असं कधी वाटलं नाही. पण, जेव्हा मी त्यांच्या टीव्ही चॅनेलमध्ये जातो, तेव्हा उद्याच दोन देशांमध्ये युद्ध होईल असं वाटतं. मी संपूर्ण भारत फिरलो आहे आणि या देशाला मी जवळून पाहिले आहे. त्यावरूनच मी ठामपणे म्हणू शकतो की, भारत पाकिस्तानसोबत काम करण्यासाठी आतुर आहे. भारताच्या प्रगतीचा मार्ग पाकिस्तानमधून जातो, याची मला खात्री पटलीय.''

कोरोना व्हायरसमुळे इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल 2020) रद्द होण्याची शक्यता आहे आणि अख्तरने त्यावर नाराजी व्यक्त केली. त्यानं त्याच्या यू ट्युब चॅनलवर म्हटले की,''मला आशा आहे की, हे नुकसान होणार नाही आणि आयपीएल स्पर्धा होईल, परंतु तसं न झाल्यास त्याला दुर्दैव म्हणावं लागेल. ''  

दरम्यान, कलम ३७० लागू केल्यानंतर काश्मीरमध्ये वाद निर्माण होऊ नये यासाठी इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्या होत्या. शाळा, महाविद्यालय हेही बंद होते. तेथील काही प्रमुख नेत्यांनाही नजर कैदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी चौफेर टीका केली होती. पण, तेव्हा त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे कोरोना विषाणूमुळे ठप्प झालेल्या जगाला काश्मीर म्हणून अख्तरनं प्रश्न विचारला. अख्तर ट्विट केलं की,''लॉकडाउन झाल्यानंतर कसं वाटतंय? - काश्मीर'' त्यानं या ट्विट आडून भारत सरकारवर निशाणा साधला आहे.   

टॅग्स :शोएब अख्तरपाकिस्तानआयपीएल 2020