पोचेफस्ट्रूम : भारतीय महिला संघाला एकदिवसीय मालिकेतील अखेरच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला असला तरी त्यामुळे संघाचा आत्मविश्वास मात्र ढासळलेला नाही. एकदिवसीय मालिका जिंकणारा भारतीय महिला संघ मंगळवारपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रारंभ होणा-या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत विजय मिळवण्यास उत्सुक आहे.
पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये शानदार विजय मिळवणाºया भारतीय महिला संघाला गेल्या शुक्रवारी तिसºया एकदिवसीय सामन्यात ७ गड्यांनी पराभव स्वीकारावा लागला.
या पराभवाचा विशेष फरक पडला नाही. कारण भारतीय संघाने तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजय मिळवला. पराभव इशारा देणारा ठरला असला तरी भारत निराशा झटकून टी-२० मालिकेत विजयी सुरुवात करण्यास उत्सुक आहे.
भारताने पहिल्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये ८८ व १७८ धावांनी शानदार विजय नोंदवला. टी-२० मध्ये संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हरमनप्रीत कौरच्या खांद्यावर राहणार आहे. फॉर्मात असलेली स्मृती मानधना उपकर्णधार राहील.
टी-२० स्पेशालिस्ट अनुजा पाटील व पदार्पण करणारी अष्टपैलू राधा यादव व यष्टिरक्षक नुजहज परवीन यांच्या समावेशामुळे संघ मजबूत झाला आहे. टी-२० संघात मुंबईची १७ वर्षीय खेळाडू जेमिमा रोड्रिगेजचा समावेश आहे. दीप्ती शर्मा व वेदा कृष्णूर्ती टी-२० क्रिकेटमध्ये फॉर्म कायम राखण्यास उत्सुक आहे. भारताचे यश हरमनप्रीत व मिताली राज यांच्या कामगिरीवर बºयाच अंशी अवलंबून आहे. गोलंदाजीमध्ये अनुभवी झुलन गोस्वामी अंतिम ११ खेळाडूंमध्ये परतणार असल्याचे संकेत मिळत आहे. तिसºया एकदिवसीय सामन्यामध्ये तिला विश्रांती देण्यात आली होती. (वृत्तसंस्था)
प्रतिस्पर्धी संघ
दक्षिण आफ्रिका :- डेन वान निकर्क (कर्णधार), मारिजाने काप, तृषा चेट्टी, शबनिम इस्माईल, अयाबोंगा खाका, मसाबाटा क्लास, सुने लुस, ओडिने कर्स्टन, मिननोन ड्यू प्रीज, लिजले ली, च्लो ट्रायन, नादिने डी क्लर्क, रायसिबे एनटोजाखे, मोसेलिन डेनियल्स.
भारत :- हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मंधाना (उपकर्णधार), मिताली राज, वेदा कृष्णमूर्ती, जेमिमा रोड्रिगेज, दीप्ती शर्मा, अनुजा पाटील, तानिया भाटिया, नुजहत परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे, पूजा वस्त्राकर, राधा यादव.