लंडन : प्रबळ दावेदारांमध्ये समावेश असलेला भारतीय संघ येथे विश्वचषक स्पर्धेत शनिवारी आपल्या पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. या लढतीच्या निमित्ताने भारतीय खेळाडूंना येथील वातावरणासोबत जुळवून घेण्याची संधी मिळेल. दरम्यान, भारतीय संघ चौथ्या क्रमांकावरील फलंदाजबाबतचा संभ्रम मिटवण्यासाठी प्रयत्नशील राहील. केनिंग्टन ओव्हलमध्ये खेळल्या जाणाऱ्या या लढतीत भारतीय संघ मजबूत गोलंदाजी आक्रमणामध्ये प्रयोग करण्याऐवजी लोकेश राहुल व विजय शंकर यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवणार आहे. हे दोन्ही फलंदाज चौथ्या स्थानाच्या शर्यतीत आहेत.
विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धेत दोन जेतेपदांमध्ये आणखी एका जेतेपदाची भर घालण्याच्या निर्धाराने येथे दाखल झाला आहे. भारताने १९८३ व २०११ मध्ये विश्वविजेतेपदाचा मान मिळवला आहे. एकदिवसीय क्रमवारीत भारतीय संघ दुसºया स्थानी आहे. भारतीय संघ यजमान इंग्लंडसह गतविजेत्या आॅस्ट्रेलियासोबत स्पर्धेत प्रबळ दावेदारांमध्ये सामील आहे.
५ जून रोजी साऊथम्पटनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताच्या मोहिमेची सुरुवात होईल. प्रतिस्पर्धी संघाची नजर भारतीय कर्णधारवर असेल. तो ५० षटकांच्या क्रिकेट व्यतिरिक्त कसोटी क्रिकेटमध्येही अव्वल फलंदाज आहे. त्याचसोबत प्रतिस्पर्धी संघ भारताच्या वेगवान माºयाची क्षमता जाणून घेण्यास उत्सुक आहे. सलामीवीर रोहित शर्मा व शिखर धवन यांच्यानंतर तिसºया क्रमांकावर विराट कोहलीच्या उपस्थितीमुळे भारत जगातील सर्वांत मजबूत संघ आहे. अनुभवी महेंद्रसिंग धोनी, अष्टपैलू केदार जाधव आणि हार्दिक पांड्या यांच्या उपस्थितीमुळे भारताची फलंदाजीची बाजू भक्कम आहे.प्रतिस्पर्धी संघांची भारताच्या वेगवान गोलंदाजी माºयावर लक्ष असेल. ते येथील परिस्थितीचा कसा लाभ घेतात, भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. जागतिक एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेला गोलंदाज जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करणार आहे. त्यात मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार आणि हार्दिक पांड्या यांचा समावेश आहे.
कोहलीने संघाच्या क्षमतेवर विश्वास व्यक्त केला आहे, तर न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सन म्हणाला, ‘गेल्या काही दिवसांत संघाने एकत्र सराव करणे चांगली बाब आहे. आम्ही दोन महिन्यांपासून एकत्र खेळलो नव्हतो, पण हे केवळ आमच्याबाबतच घडलेले नाही.’ न्यूझीलंडने आपला अखेरच्या एकदिवसीय सामना १९ फेब्रुवारी रोजी बांगलादेशविरुद्ध खेळला होता. (वृत्तसंस्था)