Join us  

जेम्स अँडरसनच्या स्विंगपुढे भारतीयांची दाणादाण, भारताचा डाव १०७ धावांमध्ये संपुष्टात

आधीच पावसाच्या व्यत्ययामुळे अडचणी वाढल्या असताना जेम्स अँडरसनच्या भेदक स्विंग माऱ्यापुढे दुस-या कसोटीत भारताचा पहिला डाव ३५.२ षटकांमध्ये अवघ्या १०७ धावांत संपुष्टात आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2018 3:17 AM

Open in App

लॉर्ड्स : आधीच पावसाच्या व्यत्ययामुळे अडचणी वाढल्या असताना जेम्स अँडरसनच्या भेदक स्विंग माऱ्यापुढे दुस-या कसोटीत भारताचा पहिला डाव ३५.२ षटकांमध्ये अवघ्या १०७ धावांत संपुष्टात आला. रविचंद्रन अश्विन (२९) व कर्णधार विराट कोहली (२३) यांनी सर्वाधिक धावा केल्या. पावसामुळे उशीराने खेळ सुरु झाल्यानंतर अँडरसनचा भेदक मारा बरसला.ऐतिहासिक लॉडर््स मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेल्यानंतर शुक्रवारी सामन्याच्या दुसºया दिवशी नाणेफेक झाली. यावेळी इंग्लंड कर्णधार जो रुट याने नाणेफेक जिंकत भारताला प्रथम फलंदाजीस निमंत्रित केले. मात्र पहिल्याच षटकात अँडरसनने मुरली विजयला त्रिफळाचीत करत भारताची वाटचाल खडतर असल्याचे संकेत दिले. यानंतर काहीवेळ राहुलने २ चौकार मारत आश्वासक सुरुवात केली खरी, मात्र अँडरसनने त्याला स्विंग चेंडूवर यष्टीरक्षकाकडे झेल देण्यास भाग पाडले आणि भारताची ६.१ षटकात २ बाद १० धावा अशी अवस्था झाली. दोन्ही सलामीवीर झटपट परतल्याने कोहलीला लवकर मैदानात यावे लागले. त्याने पुजारासह संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. यानंतर ठराविक अंतराने भारताला धक्के देत इंग्लंडने सामन्यावर एकहाती वर्चस्व मिळवले.ख्रिस वोक्सनेही अचूक मारा करत २ बळी घेतले. त्याने इंग्लंडसाठी अत्यंत महत्त्वाचा बळी घेत कोहलीला बाद केले. कोहलीने ५७ चेंडूत २ चौकारांसह २३ धावा केल्या. अजिंक्य रहाणेही (१८) विशेष छाप पाडू शकला नाही. तळाच्या फळीत रविचंद्रन अश्विनने ३८ चेंडूत ४ चौकारांसह २९ धावा करत चांगली झुंज दिली. मात्र तो परतल्यानंतर भारताचा डाव झटपट गुंडाळला गेला. (वृत्तसंस्था)>पाऊस थांबल्यानंतर लगेच भारताला तिसरा झटका बसला. २५ चेंडू खेळून पुजारा केवळ एक धाव काढून धावबाद झाला. यानंतर लंच ब्रेक घेतला गेला आणि पुन्हा पाऊस सुरु झाला. ऊन पडल्यानंतर भारताची मदार कोहलीवर होती. मात्र वोक्सने त्याला बाद केल्यानंतर भारताचे स्टार फलंदाज ढेपाळले.

>पहिल्या षटकापासून स्विंग मारा करणाऱ्या जेम्स अँडरसनने भेदक मारा करताना भारतीय सलामीवीरांना आपल्या तालावर नाचवले. मुरली विजय त्याच्याविरुद्ध चाचपडत खेळत होता आणि पहिल्याच षटकातील पाचव्या चेंडूवर अँडरसनने त्याचा त्रिफळा उडवत भारताला पहिला धक्का दिला.>दुसरीकडे आश्वासक सुरुवात केलेल्या राहुलला अँडरसनने यष्टीरक्षक बेयरस्टोकडे झेल देण्यास भाग पाडले. यानंतर त्याने भरवशाचा अजिंक्य रहाणे, कुलदीप यादव व इशांत शर्मा यांनाही आपल्या स्विंगच्या जोरावर तंबूचा रस्ता दाखवला.>धावफलभारत (पहिला डाव) : विजय त्रि. गो. अँडरसन ०, राहुल झे. बेयरस्टो गो. अँडरसन ८, पुजारा धावबाद (पोप) १, कोहली झे. बटलर गो. वोक्स २३, रहाणे झे. कूक गो. अँडरसन १८, हार्दिक झे. बटलर गो. वोक्स ११, कार्तिक त्रि. गो. कुरन १, अश्विन पायचीत गो. ब्रॉड २९, कुलदीप पायचीत गो. अँडरसन ०, शमी नाबाद १०, इशांत पायचीत गो. अँडरसन ० अवांतर - ६. एकूण : ३५.२ षटकात सर्वबाद १०७ धावा.गोलंदाजी : अँडरसन ५/२०; वोक्स २/१९; कुरन १/२६; ब्रॉड १/३७.