हैदराबाद : महेंद्रसिंग धोनीचे फलंदाजीतील अपयश बघता त्याला ‘कव्हर’ म्हणून निवडकर्ते गुरुवारी वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय एकदिवसीय संघाची निवड करताना ऋषभ पंत याला संधी देऊ शकतात.
संघ निवड पहिल्या तीन सामन्यांसाठी की संपूर्ण मालिकेसाठी असेल हे देखील निश्चित नाही. २१ आॅक्टोबरपासून पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होत असून पाठोपाठ तीन सामन्यांची टी-२० मालिका देखील खेळली जाईल. कर्णधार विराट कोहलीवर कामाचा ताण वाढत असल्याचा मुद्दा चर्चेला येईल. पण तो मालिकेतून विश्रांती घेऊ शकतो, याची शक्यता कमी आहे.
धोनी यष्टिरक्षणात तरबेज आहे, यात काहीच शंका नाही. अलीकडे फलंदाजीत मात्र तो ढेपाळत चालला. निवडकर्ते यावर चर्चा करणार असून यासंदर्भात माहिती असलेल्या बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने बुधवारी वृत्तसंस्थेला सांगितले की, ‘धोनी विश्वचषकापर्यंत खेळत राहणार हे सर्वांना ठाऊक आहे. तरीही ऋषभ पंतला संधी देण्यात काहीच गैर नाही. सहाव्या किंवा सातव्या स्थानावर ऋषभ शानदार फलंदाजी करू शकतो. सामना जिंकून देण्याची त्याच्यात क्षमता आहे.’
ओव्हलवर इंग्लंडविरुद्ध पहिल्या शतकाची नोंद केलेल्या ऋषभने विंडीजविरुद्ध राजकोटमध्ये ९२ धावा ठोकल्यापासून २० वर्षानंतर यष्टिरक्षक-फलंदाजाला संघात सहभागी करण्याची मागणी जोर धरू लागली.
दिनेश कार्तिक संघात असला तरी त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव जाणवतो. मोक्याच्या क्षणी सामना जिंकून देण्यात तो अपयशी ठरला, हा संघ व्यवस्थापनाच्या चिंतेचा विषय आहे. निवडकर्ते याशिवाय अन्य पर्यायांवरही विचार करतील. केदार जाधव मांसपेशी ताणल्या गेल्यामुळे त्रस्त आहे. त्यामुळे एकदिवसीय संघात मधल्याफळीत एक स्थान रिक्त झाले. या स्थानी अंबाती रायुडूचा विचार होऊ शकतो.
जडेजाला संधी
कसोटी मालिकेतून ब्रेक घेणारे वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांचे पुनरागमन निश्चित असून रवींद्र जडेजा याला पुन्हा संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. मनीष पांड्येला मात्र संघाबाहेर व्हावे लागेल. गेल्या काही दिवसांत त्यालाही चांगली कामगिरी करता आली नव्हती.