मोर्तुवा (श्रीलंका): सलामीवीर यशस्वी जैस्वालच्या नाबाद शतकी खेळीच्या बळावर भारताच्या १९ वर्षांखालील संघाने पाचव्या आणि अखेरच्या युवा आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात श्रीलंकेचा आठ गड्यांनी पराभव केला. या शानदार विजयासह भारतीयांनी पाच सामन्यांची मालिका ३-२ ने जिंकली.
जैस्वालने आठ चौकार आणि तीन षटकारांसह नाबाद ११४ धावांचे योगदान दिले. याशिवाय देवदत्त पडिक्कल ३८, पवन शाह ३६ आणि आर्यन जुयाल (नाबाद २२) यांनी विजयात योगदान दिले. भारताने २१३ धावांचा पाठलाग करताना ४२.४ षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात २१४ धावा करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
त्याआधी श्रीलंकेच्या १९ वर्षांखालील संघाने नाणेफेक
जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत ९ गड्यांच्या मोबदल्यात २१२ धावा उभारल्या. सलामीवीर निशान
मदुष्का ९५ आणि मधल्या फळीतील नुवानिंदू फर्नांडो ५६ यांच्या अर्धशतकी खेळीमुळे लंकेने दोनशे धावांच्या पलीकडे मजल गाठली. भारताकडून मोहित जांगडा याने
३० धावा देत दोन गडी बाद
करत चांगला मारा केला. भारताने याआधी युवा कसोटी मालिकेत लंकेला डावाच्या फरकाने पराभूत केले होते. (वृत्तसंस्था)
>संक्षिप्त धावफलक
श्रीलंका (१९ वर्षांखालील) : ५० षटकात ९ बाद २१२ धावा (निशान मदुष्का ९५, नुवानिंदू फर्नांडो ५६; मोहित जांग्रा २/३०) पराभूत वि. भारत (१९ वर्षांखालील) : ४२.४ षटकात २ बाद २१४ धावा (यशस्वी जैस्वाल नाबाद ११४, देवदत्त पदिक्कल ३८, पवन शाह ३६, आर्यन जुयल नाबाद २२; लक्षिता मनसिंघे १/३७, अविष्का लक्षण १/३८.)