किम्बर्ले : भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या पावलावर पाऊल ठेवताना भारतीय महिला संघाने आयसीसी वुमेन्स चॅम्पियनशिप एकदिवसीय लढतीत दक्षिण आफ्रिकेवर आज ८८ धावांनी दणदणीत विजय मिळवला.
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाºया भारतीय संघाने स्मृती मानधना हिच्या ८४ आणि मिताली राज हिच्या ४५ धावांच्या बळावर ५0 षटकांत ७ बाद २१३ धावा केल्या. त्यानंतर भारताने झुलन गोस्वामीने घेतलेल्या ४ बळींच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेला ४३.२ षटकांत १२५ धावांत गुंडाळले.
सलामीची फलंदाज स्मृती मानधना हिने पूनम राऊत (१९) हिच्या साथीने पहिल्या गड्यासाठी ५५ आणि मिताली राज हिच्या साथीने दुसºया गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी केली. ३६ व्या षटकात स्मृती बाद झाल्यानंतर संघ अखेरच्या १४.३ षटकांत फक्त ५९ धावांची भर धावसंख्येत टाकू शकला. दक्षिण आफ्रिकेकडून अयाबोंग खाका आणि मरिजन्ने काप यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. भारतीय गोलंदाजांनी लक्ष्याचा पाठलाग करणाºया फलंदाजांवर प्रारंभापासूनच पकड मजबूत केली. कर्णधार डिन वॅन निकर्क (४१) हिच्याशिवाय एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकला नाही. झुलन गोस्वामीने ९.२ षटकांत २४ धावांत ४ गडी बाद केले. शिखा पांडेने ३ फलंदाजांना तंबूत धाडले तर पूनम यादवने २ गडी बाद केले.
।संक्षिप्त धावफलक
भारत : ५0 षटकांत ७ बाद २१३. (स्मृती मानधना ८४, मिताली राज ४५).
दक्षिण आफ्रिका : ४३.२ षटकांत सर्व बाद १२५. (डिन वॅन निकर्क ४१. झुल्लन गोस्वामी ३/२४, शिखा पांडे ३/२३, पूनम यादव २/२२)