बडोदा : पहिल्या लढतीत पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय महिला क्रिकेट संघ बलाढ्य आॅस्ट्रेलियाविरुद्ध गुरुवारी दुसऱ्या एकदिवसीय लढतीत तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
ही मालिका आयसीसी महिला एकदिवसीय चॅम्पियनशिपचा भाग असल्याने उभय संघांसाठी महत्त्वाची आहे. सलामीला आॅस्ट्रेलियाने जवळजवळ १८ षटके शिल्लक राखून ८ गड्यांनी बाजी मारली. आॅस्ट्रेलियाच्या फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवत आठ बळी घेतले. त्यामुळे भारताला फिरकीपटूंविरुद्ध चांगली कामगिरी करावी लागेल.
तसेच, भारताला कर्णधार मिताली राजची उणीव भासली. गुरुवारी मिताली तंदुरुस्त होण्याची शक्यता आहे. स्मृती मानधना व पूनम राऊत या अनुभवी जोडीकडून संघाला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा आहे. १७ वर्षीय जेमिमा रॉड्रिग्जला पदार्पणाच्या लढतीत विशेष छाप सोडता आली नाही. मितालीच्या पुनरागमनानंतर ती संघातील स्थान कायम राखते का, याची उत्सुकता आहे. आॅस्ट्रेलियाची सलामीवीर निकोल बोल्टन शानदार फॉर्मात आहे. त्याचप्रमाणे तिची सहकारी एलिसा हिली व कर्णधार मेग लॅनिंगही मोठी खेळी करण्यासाठी उत्सुक असतील. (वृत्तसंस्था)