मुंबई : मध्यमगती गोलंदाज मेगान स्कटने नोंदवलेल्या हॅट््ट्रिकच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने तिरंगी टी-२० सामन्यात सोमवारी भारताचा ३६ धावांनी पराभव केला. यामुळे भारतीय संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेला आहे.
हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा हा सलग तिसरा पराभव आहे. भारताला या स्पर्धेत अद्याप गुणांचे खाते उघडता आलेले नाही. आता गुरुवारी भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध प्रतिष्ठा राखण्यासाठी मैदानात उतरेल.
भारताने नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. बेथ मुनी (७१) व एलिस विलानी (६१) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने ५ बाद १८६ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना भराताचा डाव ५ बाद १५० धावांत रोखल्या गेला.
स्कटने हॅट््ट्रिक घेत ब्रेबोर्न स्टेडियममध्ये सनसनाटी निर्माण केली. तिने फॉर्मात असलेल्या स्मृती मानधना (३), अनुभवी मिताली राज (०) व दीप्ती शर्मा (२) यांना बाद करीत भारताच्या आघाडीच्या फळीवर वर्चस्व गाजवले. तिने दुसऱ्या षटकातील पाचव्या व सहाव्या चेंडूंवर मानधना व मिताली यांना बाद केले तर, पाचव्या षटकातील पहिल्याच चेंडूवर दीप्तीला तंबूचा मार्ग दाखवीत हॅट््ट्रिक पूर्ण केली. टी-२० महिला क्रिकेटमध्ये हॅट््ट्रिक घेणारी ती पहिली आॅस्ट्रेलियन गोलंदाज ठरली.
भारताची एकवेळ ३ बाद २६ अशी अवस्था होती. त्यानंतर हरमनप्रीत (३३) व युवा फलंदाज जेमिमा रॉड्रिग्स (४१ चेंडू, ५० धावा) यांनी चौथ्या विकेटसाठी ५४ धावांची भागीदारी केली. जेमिमाने कारकिर्दीतील पहिले टी२० अर्धशतक झळकावले. परंतु संघाला विजयी करण्यात तिची खेळी अपयशी ठरली. अनुजा पाटीलने २६ चेंडूंना सामोरे जाताना ३८ तर पूजा वस्त्राकारने नाबाद १९ धावा केल्या. पण त्यांची खेळी केवळ पराभवातील अंतर कमी करणारी ठरली. पूजा वस्त्राकारने यापूर्वी २८ धावांच्या मोबदल्यात २ बळीही घेतले. आॅस्ट्रेलियाची सुरुवातीला २ बाद २९ अशी स्थिती होती. पण विलानी व मुनी यांनी ११४ धावांची भागीदारी करीत आॅस्ट्रेलियाचा डाव सावरला.