मुंबई : आगामी एएफसी आशियाई चषक पात्रता स्पर्धेची पुर्वतयारी म्हणून आजपासून भारतीय संघ मुंबईत त्रिकोणीय आंतरराष्ट्रीय फुटबॉल मालिकेत स्वत:ला आजमावेल. शनिवारी मुंबईतील अंधेरी क्रीडा संकुलामध्ये भारतीय संघ जागतिक क्रमवारीत आपल्याहून कमी रँकिंग असलेल्या मॉरिशसविरुध्द दोन हात करेल.
फिफा क्रमवारीमध्ये भारत ९७ व्या स्थानी असून मॉरिशसविरुद्धच्या सामन्यानंतर २५ आॅगस्टला भारताचा सामना सेंट किट्स आणि नेविस संघाविरुद्ध होईल. मॉरिशस फिफा क्रमवारीत १६० व्या स्थानी असून सेंट किट्स आणि नेविस संघ १२५व्या स्थानावर आहे.
दरम्यान, फिफा क्रमवारीत आपल्याहून वरच्या स्थानी असलेल्या संघाविरुद्ध खेळून भारताला ५ सप्टेंबरला होणाºया मकाऊविरुद्धच्या सामन्याच्या तयारीसाठी अधिक प्रमाणात सज्ज होण्यास मदत झाली असती. परंतु, ही त्रिकोणीय मालिका जिंकूनही भारताला काही गुणांचा फायदा होईल.
म्यानमार आणि किर्गिस्तान सारख्या संघांना पराभवाचा धक्का दिल्यानंतर भारत एएफसी चषक पात्रता फेरी स्पर्धेच्या ‘अ’ गटात अव्वल स्थानी आहे. त्याचवेळी, मकाऊविरुद्धचा सामना अत्यंत खडतर असेल. त्यामुळेच त्रिकोणीय मालिकेतील कामगिरीद्वारे प्रशिक्षक स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांना संघ कितपत तयार आहे हे जाणून घेण्यात मदत होईल. त्रिकोणीय मालिकेत भारताला अनुभवी मिडफील्डर यूजीनसन लिंगदोह, युवा खेळाडू जेरी लालरिंजुआला, उदांता सिंग यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत.
>मॉरिशस फिफा क्रमवारीमध्ये १६०व्या स्थानी आहे. २३ जुलैला झालेल्या अधिकृत सामन्यात मॉरिशसला अँगोलाविरुध्द २-३ असा निसटता पराभव पत्करावा लागला होता. फ्रान्सीस्को फिल्हो यांची नुकताच मॉरिशसच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाली असून त्यांनी अॅलेक्स फर्ग्युसन यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर युनायटेडच्या युवा प्रशिक्षकपदाची जबाबदारी पार पाडली आहे. फुटबॉल स्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो यालाही त्याच्या उमेदीच्या काळामध्ये फिल्हो यांनी काहीकाळ मार्गदर्शन केले आहे. त्रिकोणीय मालिकेद्वारे युवा खेळाडूंची तयारी पाहता येईल, असे सांगताना भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कॉन्स्टेनटाइन यांनी म्हटले की, ‘सुरुवातीला एक सामना खेळण्याची माझी योजना होती. हाँगकाँग आणि चीनी तैपई एकाच शैलीने खेळतात. मात्र, दोन सामने खेळण्याची संधी मिळाल्याने मला संघाला तयार करण्यासाठी अधिक वेळ मिळेल. यामुळे मला युवा खेळाडूंची परीक्षा घेण्यास मिळेल.’ भारतीय फुटबॉल संघाला घरच्या मैदानाचा लाभ होईल. अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर भारतीय संघाने अनेक सराव सत्र पार पाडले असून याच स्टेडियमवर भारताने याआधीचा आंतरराष्ट्रीय मैत्री सामन्यात नेपाळविरुद्ध विजय मिळवला होता. त्यामुळे, मुंबईतील स्टेडियमचा चांगला अभ्यास असल्याचा फायदा भारतीय संघाला मिळेल.
>संभाव्य संघ - भारत
गोलरक्षक : सिब्रता पॉल, गुरप्रीत सिंग संधू, अल्बिनो गोम्स, विशाल केथ आणि टीपी रेहनेश.
बचावफळी : प्रितम कोटल, संदेश झिंगन, अर्नब मोंडल, अनस एदाथोडिका, नारायन दास, जेरी लालरिंझुआला, लालरुआथरा, सलम रंजन सिंग, सार्थक गोलुई आणि देविंदर सिंग.
मध्यरक्षक : धनपाल गणेश, जॅकिचंद सिंग, सत्यासेन सिंग, निखिल पुजारी, विकास जेरु, मिलन सिंग, उदांता सिंग, युजेनसन लिंगदोह, मोहम्मद रफिक, रोलिन बोर्ग्स, हालिचरण नरझरे, हरमनप्रीत सिंग आणि अनिरुध्द थापा.
आक्रमक : जेजे लालपेखलुआ, सुमीत पास्सी, सुनील छेत्री, रॉबिन सिंग, बलवंत सिंग आणि मनवीर सिंग.
>मॉरिशस
गोलरक्षक : केविन जीन - लुईस, ख्रिस्तोफर केसर्न.
बचावफळी : मार्को डोर्झा, इम्म्युनुएल विसेन्ट जीन, फ्रान्सीस रासोलोफोर्निया,
डॅमिन बालिस्सन, मेर्विन जॅकलिन, कायलिन येर्नार्ड आणि सॅम्युअल रेबेट.
मध्यरक्षक : लुथर रोस, फ्रेड्रिक साराह, जेस्सन रंगासॅमी, केविन पेर्टिकोट्स, गियानो शिफोन, जोनाथन अझा, केविन ब्रू, वॉल्टर डुप्रे सेंट मार्टिन, निक हॅरेल आणि सेड्रिक थिओडोरे.
आक्रमक : जोनाथन जस्टिन.