Join us  

'कॅप्टन कूल' महेंद्रसिंग धोनीची '7' क्रमांकाची जर्सी निवृत्त होणार, कारण...

भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 11:33 AM

Open in App

मुंबई : भारतीय संघ 3 ऑगस्टपासून वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे. ट्वेंटी-20 मालिकेतून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर तीन वन डे आणि दोन कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. ऑस्ट्रेलियातील ऐतिहासिक कसोटी मालिका विजयानंतर भारतीय संघ प्रथमच कसोटी मालिका खेळणार आहे आणि ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा भाग असणार आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करताना माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. पण, निवड समितीनं त्यावर पूर्णविराम लावताना धोनीला विश्रांती देणार असल्याचे स्पष्ट केले.

वर्ल्ड कपदरम्यानच धोनी निवृत्ती घेणार होता, पण कोहलीनं त्याला थांबवलं; कारण...

निवड समितीनं या दौऱ्यासाठी तीनही फॉरमॅटमधील संघांची घोषणा केली आहे. ऑस्ट्रेलियात 71 वर्षांनंतर भारतीय संघाने कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. निवड समितीनंही त्या संघात फार बदल केलेला नाही. त्यांनी केवळ यष्टिरक्षक वृद्धीमान सहाचा समावेश केला आहे. कसोटी क्रिकेटची प्रसिद्धी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) कसोटी क्रिकेटच्या जर्सीवरही खेळाडूचे नाव व क्रमांक लिहिण्याची मुभा दिली आहे. इंग्लंड विरुद्ध आयर्लंड यांच्यातील एकमेव कसोटीतून या नियमाची अंमलबजावणीही झाली. त्यामुळेच भारतीय संघाला कसोटी मालिकेत या नव्या जर्सीत पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

धोनी क्रिकेटपासून दोन महिनेच का लांब राहणार, जाणून घ्या...

भारतीय संघाने नेहमीच माजी दिग्गज खेळाडूंचा आदर केला आहे आणि त्यामुळे सचिन तेंडुलकरच्या निवृत्तीनंतर त्याची 10 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्यात आली. धोनी सध्या वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेट खेळत आहे, परंतु त्यानं 2014-15 कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. पण, आता कसोटीतही जर्सीवर क्रमांक दिसणार असल्यानं 7 क्रमांकाची धोनीची जर्सी कोणाला मिळेल, याची उत्कंठा वाढली होती. पण, बीसीसीआयनं धोनीची 7 क्रमांकाची जर्सी निवृत्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

धोनी लष्करासोबत काश्मीरमध्ये घेणार प्रशिक्षण, लष्करप्रमुखांनी दिली परवानगी 

कसोटी मालिकेत संघातील सर्वच खेळाडू मर्यादित षटकांच्या सामन्यात वापरणारा क्रमांकच जर्सीवर कायम ठेवणार आहेत, असेही बीसीसीआयनं स्पष्ट केलं. ''संघातील अनेक खेळाडू वन डे आणि ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये ज्या क्रमांकाची जर्सी परिधान करतात तोच क्रमांक कसोटीतही कायम ठेवणार आहेत. धोनीच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेटमध्ये 7 क्रमांकाच्या जर्सीचा पर्यायही उपलब्ध आहे, परंतु कोणीही तो क्रमांक परिधान करेल, याची शक्यता फार कमीच आहे. 7 क्रमांक म्हणजे एमएस धोनी, हे लोकांच्या मनात घट्ट बसले आहे. वन डे मालिकेनंतर कसोटी क्रिकेटसाठीचा किट विंडीजमध्ये दाखल होईल,'' असेही बीसीसीआयनं स्पष्ट केलं.

धोनीबाबतची ही सात आश्चर्य, वाचाल तर थक्क व्हाल...

धोनीच्या निवृत्तीबाबत निवड समिती अध्यक्ष काय म्हणाले, वाचा...

 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज