Join us  

भारतीय गोलंदाजांची कमाल, मागील सहापैकी पाच कसोटींत घेतले शंभर बळी

परदेशात भारतीय गोलंदाजांना कसोटीच्या दोन्ही डावांत प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्यात नेहमीच अडचण आली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 12:27 PM

Open in App

मुंबई - परदेशात भारतीय गोलंदाजांना कसोटीच्या दोन्ही डावांत प्रतिस्पर्धी संघाला दोनदा बाद करण्यात नेहमीच अडचण आली. कपिल देव, जवागल श्रीनाथ अशा अनेक दिग्गज गोलंदाजांच्या उपस्थितीतही परदेशात अनेकदा एका कसोटीत 20 बळी टिपता आले नाही. मात्र, विराट कोहलीने नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारताच या कमकुवत बाजूवर लक्ष केंद्रित केले. त्यासाठी त्याने फलंदाज निवडीत बरेच प्रयोगही केले. विराट आणि संघ व्यवस्थापनाचे हे प्रयोग यशस्वी ठरले. 

परदेशात खेळलेल्या मागील सहापैकी पाच कसोटी सामन्यांत भारतीय गोलंदाजांना 20 विकेट घेण्यात यश आले आहे. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड येथे भारताने प्रत्येकी तीन कसोटी सामने खेळले आहेत. प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी नॉटिंगहॅम कसोटीनंतर, ही भारताची आत्तापर्यंतची सर्वोत्तम गोलंदाजांची फळी असल्याचे मत व्यक्त केले होते. विराटनेही त्यांच्या या मताला दुजोरा दिला. 

भारताने 1986 मध्ये इंग्लंडमध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली होती. त्या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडला सातत्याने ऑलआउट केले होते. तशीच कामगिरी या मालिकेत इशांत शर्मा, हार्दिक पांड्या आणि मोहम्मद शमी यांनी इंग्लंडविरूद्धच्या मागील तीन कसोटी सामन्यांत केली आहे. इशांतने 3 सामन्यांत 11, हार्दिकने 9 आणि शमीने 8 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय नॉटिंगहॅम कसोटीत खेळणाऱ्या जस्प्रीत बुमराने दुसऱ्या डावात पाच विकेट घेत इंग्लंडला हादरे दिले. 

भारताचा स्विंग गोलंदाज भुवनेश्वर कुमारला दुखापतीमुळे संघाबाहेर रहावे लागले आहे. त्याच्या अनुपस्थितीत अन्य गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथा सामना 30 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.  

टॅग्स :भारत विरुद्ध इंग्लंडइशांत शर्माजसप्रित बुमराहहार्दिक पांड्यामोहम्मद शामी