भारत अफगाणिस्तानचा सफाया करणार!, आज अखेरचा टी-२० सामना

रोहित धावांचे खाते उघडणार? कुलदीप, आवेशच्या समावेशाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:07 AM2024-01-17T06:07:18+5:302024-01-17T06:07:47+5:30

whatsapp join usJoin us
India will wipe out Afghanistan!, the last T20 match today | भारत अफगाणिस्तानचा सफाया करणार!, आज अखेरचा टी-२० सामना

भारत अफगाणिस्तानचा सफाया करणार!, आज अखेरचा टी-२० सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

बंगळुरू : मालिका विजय मिळविणारा भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या टी-२० सामन्यात बुधवारी विजयी लय कायम राखून प्रतिस्पर्धी संघाला ‘क्लीन स्वीप’ देण्याच्या इराद्याने खेळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा हादेखील स्वत:चा फॉर्म सिद्ध करेल, अशी अपेक्षा आहे. 

जूनमध्ये आयोजित टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा हा अखेरचा सामना असेल. मोहाली आणि इंदूरमध्ये विजय मिळाल्यानंतर येथेही कसर शिल्लक राखायची नाही, असा संघ व्यवस्थापनाचा विचार असावा. दोन्ही सामन्यांत सहा गड्यांनी मिळालेल्या विजयात पहिल्या चेंडूपासून आक्रमकतेची रणनीती मोलाची ठरली. भारताने पहिल्या सामन्यात १५९ धावांचे लक्ष्य १७.३ षटकांत आणि दुसऱ्या सामन्यात १७३ धावांचे लक्ष्य १५.४ षटकांत गाठले होते. याआधी भारतीय खेळाडू सुरुवातीला सावध आणि त्यानंतर डेथ ओव्हरमध्ये फटकेबाजीची रणनीती अवलंबत होते. पण, आता फलंदाज पहिल्या चेंडूपासून आक्रमक खेळतात. 

शिवाम दुबे आणि विराट कोहली यांनी याची झलक दाखविली. १४ महिन्यानंतर पहिला टी-२० सामना खेळणाऱ्या कोहलीने इंदूरमध्ये १६ चेंडूत २९ धावा केल्या. शिवम दुबे याने स्टार फिरकीपटू राशिद खान याच्या अनुपस्थितीत भारताकडून दोन अर्धशतके ठोकली. सलामीवीर यशस्वी जैस्वाल यानेही अर्धशतक ठोकले. या दोन्ही युवा खेळाडूंवर नजर असेल. कर्णधार रोहितची बॅट मात्र अद्याप तळपलेली नाही. पहिल्या सामन्यात शुभमन गिलसोबत धाव घेताना तो बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात फझलहक फारूकीच्या चेंडूचा वेध घेण्यात त्याला अपयश आले होते. पहिल्या  दोन सामन्यांत भोपळा न फोडताच बाद झालेल्या रोहितकडून बुधवारी मोठ्या खेळीची अपेक्षा बाळगता येईल.

या सामन्यात फलंदाजीचा क्रम बदलणार नसला तरी कुलदीप यादव आणि आवेश खान यांना गोलंदाजीत संधी मिळू शकते. कुलदीपला रवी बिश्नोई किंवा वॉशिंग्टन सुंदर यांच्यापैकी एकाला डच्चू देत तर आवेशला मुकेश कुमारऐवजी खेळविले जाण्याची दाट शक्यता आहे. यष्टिरक्षक - फलंदाज जितेश शर्मा हा सतत टी-२० खेळत आहे. त्यामुळे त्याला विश्रांती दिल्यास संजू सॅमसनला संधी मिळू शकेल.दुसरीकडे अफगाणिस्तानचा सलामीवीर रहमानुल्लाह गुरबाज हा दोन्ही सामन्यांत अपयशी ठरला होता. तिसऱ्या सामन्यात त्याच्याकडून संघाला मोठ्या खेळीची अपेक्षा असेल.

सामना: सायंकाळी ७:०० वाजेपासून

Web Title: India will wipe out Afghanistan!, the last T20 match today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.