Join us  

न्यूझीलंडमधील पराभवानंतर भारताला मिळणार नवा कर्णधार

आज भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 02, 2020 4:10 PM

Open in App

भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुसरी कसोटी: न्यूझीलंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. कालच्या ६ बाद ९० धावांवरून आजचा खेळ सुरू करणारा भारतीय संघ १२४ धावांत तंबूत परतला. ट्रेंट बोल्ट आणि टीम साऊदी यांच्यासमोर टीम इंडियाचे दिग्गज फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी १३२ धावांचे लक्ष्य सहज पार करून दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली. या पराभवानंतर भारतीय संघाचा कर्णधार बदण्यात येणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

न्यूझीलंड दौऱ्यानंतर टीम इंडियात नेतृत्व बदल पाहायला मिळण्याची शक्यता आहे. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला न्यूझीलंड दौऱ्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून विश्रांती दिली जाऊ शकते. अशा परिस्थितीत मायदेशात होणाऱ्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व नव्या खेळाडूकडे जाऊ शकते. विराटच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे कर्णधारपद रोहित शर्माकडे जाते, परंतु तोही दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. त्यामुळे आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेपुरता टीम इंडियाला नवा कर्णधार मिळण्याची शक्यता आहे.

शेख मुजीबूर रहमान यांच्या 100व्या स्मृतिदिनानिमित्त बांगलादेश क्रिकेट मंडळ ( बीसीबी) Asia XI vs World XI यांच्यात दोन ट्वेंटी-20 सामन्यांच्या आयोजन करणार आहे. बांगलादेशचे राष्ट्रपिता म्हणून शेख मुजीबूर रहमान ओळखले जातात. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त 18 आणि 21 मार्चला ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर ट्वेंटी-20 सामने खेळवण्यात येणार आहे.

या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आशिया एकादश संघाचे प्रतिनिधित्व करणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे. या सामन्यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी कोहलीसह मोहम्मद शमी, शिखर धवन आणि कुलदीप यादव या चार भारतीय खेळाडूंची नावं पाठवली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसे झाल्यास कोहली आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत खेळणार नाही. कारण, ही मालिका 12 ते 18 मार्च या कालावधीत खेळवण्यात येणार आहे. 12, 15 आणि 18 मार्च असे तीन वन डे सामने खेळवण्यात येणार आहेत.

कोहली आणि रोहित यांच्या अनुपस्थितीत वन डे संघाचे नेतृत्व सांभाळण्यासाठी तीन खेळाडू शर्यतीत आहेत. यात श्रेयस अय्यरचे नाव आहे. कोहली व रोहितच्या अनुपस्थितीत श्रेयस टीम इंडियाचे नेतृत्व संभाळू शकतो. स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबई संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्याच्याकडे आहे. शिवाय इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यानं दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व सक्षमपणे सांभाळले आहे. मनीष पांडे याच्याकडेही स्थानिक क्रिकेटमध्ये नेतृत्वाचा अनुभव आहे. टीम इंडियाच्या अंतिम अकरा खेळाडूंमध्ये स्थान पटकावण्यासाठी त्याला संघर्ष करावा लागत असला तरी वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत त्याला संधी मिळू शकते. अशात संघातील अनुभवी खेळाडू म्हणून कर्णधाराची जबाबदारीही त्याच्याकडे जाऊ शकते. भारत अ संघाचे नेतृत्व त्यानं केलं आहे.

लोकेश राहुल हा सक्षम पर्याय टीम व्यवस्थापनाकडे आहे. कोहली आणि रोहितच्या अनुपस्थितीत लोकेश कर्णधारपदाची जबाबदारी नीट पार पाडू शकेल, असा अनेकांना विश्वास आहे. सध्या त्याचा फॉर्म पाहता आणि कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्याची त्याची तयारी पाहता कर्णधारपद त्याच्याकडे जाऊ शकते.

टॅग्स :विराट कोहलीलोकेश राहुलरोहित शर्माशिखर धवन