Join us  

भारत विश्वविजेतेपदासाठी पाकिस्तानविरुद्ध भिडणार

बलाढ्य भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशचा ७ बळींनी धुव्वा उडवत दृष्टिहीन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 3:53 AM

Open in App

दुबई : बलाढ्य भारताने आपली विजयी घोडदौड कायम राखताना बांगलादेशचा ७ बळींनी धुव्वा उडवत दृष्टिहीन क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धडक मारली. २० जानेवारीला शारजा स्टेडियमवर जेतेपदासाठी भारतीय संघाचीलढत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाºया बांगलादेशला ३८.५ षटकांत २५६ धावांत गुंडाळल्यानंतर भारतीयांनी केवळ २३ षटकांत ३ फलंदाजांच्या मोबदल्यात २५९ धावा फटकावून अंतिम फेरी गाठली. गणेशभाई मुहुदकर याने तुफानी फटकेबाजी करताना ६९ चेंडंूत ११२ धावांचा तडाखा देत बांगलादेश गोलंदाजांची धुलाई केली. दीपक मलिक यानेही ४४ चेंडूंत ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करत गणेशला चांगली साथ दिली. या दोघांनीही निवृत्त होण्याचा निर्णय घेतल्याने बांगलादेश गोलंदाजांची सुटका झाली.अन्य उपांत्य सामन्यात पाकिस्तानने श्रीलंकेचा १५६ धावांनी धुव्वा उडवत अंतिम फेरीत प्रवेश केला. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने ४० षटकांत ९ बाद ४८९ धावांचा एव्हरेस्ट उभारला.मुहम्मद रशिद (१३९), निसार अली (९९) आणि बादर मुनिर (७२) यांनी आक्रमक फटकेबाजी केली. प्रत्युत्तरामध्ये श्रीलंकेचा संघ ४० षटकांत ७ बाद ३३३ धावांपर्यंत मजल मारू शकला.दुर्गा राव याने २० धावांत ३ बळी घेत बांगलादेशची दाणादाण उडवली. दीपक मलिक (२/४२) आणि प्रकाश जयरामैयाह (२/१४) यांनीही अचूक मारा करताना बांगलादेशला जखडवून ठेवले. आघाडीचे फलंदाज अपयशी ठरल्यानंतर अखेरच्या क्रमांकावरील अब्दुल मलिक याने ८८ चेंडूंत १०८ धावांचा तडाखा दिल्याने बांगलादेशला समाधानकारक मजल मारण्यात यश आले. शाहिदनेही ३२ धावांची झुंजार खेळी केली. नरेशभाई तुमडा याने १८ चेंडंूत ४० धावा फटकावत भारताच्या विजयाची औपचारिकता शिल्लक ठेवली. आरिफ उल्लाह याने त्याला बाद केले. डी. व्यंकटेश्वरा राव (१९*) आणि प्रकाश जयरामैयाह (१६*) यांनी भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

टॅग्स :क्रिकेटपाकिस्तानभारत