नवी दिल्ली : कारकिर्दीला धोका निर्माण झालेल्या दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नसते आणि त्यामुळेच दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनला भारताविरुद्ध आगामी कसोटी मालिकेत मोठे आव्हान निर्माण करता येणार नाही, असे मत भारताचा सिनिअर फिरकीपटू हरभजनसिंगने व्यक्त केले.
स्टेन गेल्या वर्षी आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान खांद्याचे हाड सरकल्यानंतर स्पर्धात्मक क्रिकेटपासून दूर आहे. ‘भारताची फलंदाजीची बाजू मजबूत आहे. आमच्याकडे मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा यांच्यासारखे शानदार फलंदाज आहेत. विश्व क्रिकेटमधील हा सर्वोत्तम फलंदाजी क्रम आहे.’
स्टेन व मोर्कल यांच्यासाठी या फलंदाजांना रोखणे सोपे नसेल. विशेषता स्टेन व मोर्कल स्वत:च लय शोधण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
हरभजन पुढे म्हणाला,‘दक्षिण आफ्रिकेमध्ये फलंदाजांना उसळत्या माºयाला समर्थपणे तोंड द्यावे लागेल. २० षटकांनंतर कुकाबुरा चेंडू सिम होत नाही. त्यानंतर उसळत्या माºयालाच तोंड द्यावे लागते.’ अष्टपैलू हार्दिक पांड्या सहाव्या क्रमांकावर चांगला पर्याय आहे किंवा नाही याबाबत चर्चा सुरू आहे, पण हरभजनच्या मते रोहित शर्माने या क्रमांकावर खेळायला हवे.
हरभजन म्हणाला,‘रोहित शानदार खेळाडू आहे. तो पूल व कटचे फटके चांगले खेळतो. माझ्या मते तो सहाव्या क्रमांकासाठी सर्वांत उपयुक्त आहे. तो उसळत्या माºयावर स्ट्रोक्स खेळू शकतो. हार्दिक प्रतिभावान खेळाडू आहे आणि रोहित उपयुक्त फलंदाज आहे.’
हरभजन पुढे म्हणाला,‘संघ व्यवस्थापनाने निर्णय घेण्यापूर्वी विचार केला असावा. सराव सामना खेळण्याची संधी मिळाली नाही तरी नेटमध्ये गोलंदाजांना सामन्याप्रमाणे सरावाची पूर्ण संधी मिळेल. ३०० बळी घेणारा फिरकीपटू आर. अश्विनचे भारतीय कसोटी संघातील स्थान पक्के असायला हवे. ’(वृत्तसंस्था)