ठळक मुद्देवेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या तीन सलामीवीरांना स्थान देण्यात आले आहे.
नवी दिल्ली, भारत वि. वेस्ट इंडीज : गुरुवारपासून सुरू होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर करण्यात आलेल्या भारताच्या कसोटी संघावर अनेकांनी नाराजी प्रकट केली. वीरेंद्र सेहवागनंतर कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणाऱ्या करूण नायरसह भारताला आशिया चषक जिंकून देणाऱ्या रोहित शर्माचे नाव नसल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी जाहीर केलेल्या संघात लोकेश राहुल, मयांक अग्रवाल आणि पृथ्वी शॉ या तीन सलामीवीरांना स्थान देण्यात आले आहे. राहुलने इंग्लंडविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात खणखणीत शतक झळकावले होते. त्यामुळे वेस्ट इंडीजविरुद्ध सलामीला त्याचे स्थान पक्के आहे. मयांक आणि पृथ्वी या दोघांपैकी एकालाच संधी मिळू शकते. दोन कसोटींच्या मालिकेत पहिल्या सामन्यातील संघच कायम राखण्याची शक्यता अधिक आहे. त्यात पहिल्या सामन्यात सलामीचे फलंदाज चालले तर दुसऱ्या फलंदाजाला सीमारेषेबाहेरूनच सामना पाहावा लागेल. त्यामुळे रोहित शर्माचा समावेश करण्यात आलेला नाही.
शिखर धवनने आशिया चषक स्पर्धेत खोऱ्याने धावा केल्या, परंतु इंग्लंड दौऱ्यात तो सपशेल अपयशी ठरला होता. त्यामुळे त्याला बसवणे, हाच पर्याय निवड समितीसमोर होता.
नायर गेले दीड वर्ष संघासोबत आहे आणि त्याला अंतिम अकरा खेळाडूंमध्ये संधी देण्यात आलेली नाही. त्याने आत्तापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. डिसेंबर 2016 मध्ये त्याने इंग्लंडविरुद्ध चेन्नई कसोटीत तिहेरी शतक झळकावले होते. मार्च 2017 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळला होता आणि त्यानंतर तो दीड वर्ष संघासोबत जग भ्रमंती करत आहे. पण, सलामीला तीन पर्याय निवडले असल्याने करूणचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. मधल्या फळीतही त्याला संधी मिळणे अवघडच आहे.
![]()